आमचं खरमरीत उत्तर

मार्च 14, 2007 at 12:49 अपराह्न (टवाळकी)

आमचा विश्वचषकी त्रागा – १ 

“अहो काय हे?  काय करताय काय?” आमच्या हिने वैतागून विचारले.

“आम्ही रागावलोय.” आमचे प्रामाणिक उत्तर.

“हो क्का? मग बेधडकराव कोणाला धडक देण्याच्या विचारात आहेत?”

“भारतीय क्रिकेट संघातील या प्रभृतींना. त्यांना आम्ही खरमरीत आमच्या धाटणीचे उत्तर पाठवणार आहोत.”

“हम्म! म्हणूनच कागदांचे बोळे टाकले आहेत वाटतं, मी आहे ना हक्काची मोलकरीण” ही वैतागली की मनापासून बरं वाटतं बघा!, “निदान काय खरडलंय ते तरी दाखवा.”

“हे घे वाच, नंतर टाकतो पोस्टात.”

राहुल द्रविड:

वर्ल्डकप जिंकणं ही सर्वाधिक आनंदाची गोष्ट झाली. तसं झालं नाही तरी आयुष्य काही थांबणार नाही. यू हॅव टु मूव्ह ऑन. सर्वोत्कृष्ट खेळ दाखवणे तुमच्या हातात आहे.

प्रति द्रविड:

बरोबर बोललात कॅप्टनसाहेब. यावरून आपली तयारी किती आहे ते कळलं हो आम्हाला. आम्ही आत्तापासूनच मूव्ह ऑन व्हायला लागलो आहोत आणि तुम्हाला काय हो, आयुष्य थांबत नाही, जाहिराती मिळायच्या थांबत नाहीत, समालोचन करण्याची संधी थांबणार नाही काहीच नसेल तर व्हा टिव्ही होस्ट आणि हसा खदाखदा! आम्ही आहोत ना दिवसभर खोळंबून तुमचा खेळ पाहायला.

सचिन:

आयुष्यात एकदातरी वर्ल्डकप खेळावा अशी माझी इच्छा होती. माझा पाचवा वर्ल्डकप असल्याचं माझं मलाच खरं वाटत नाहीये, बट वी वुड गिव्ह इंडिया अ रिझन टु स्माईल.

प्रति सचिन:

सच्चू कशाला फेकतोस लेका, आम्हाला मात्र हल्ली हा तुझा पाचवा वर्ल्डकप आहे हे पटू लागले आहे.  तू इथून निवृत्त झालास की राजकारणात जाशील बघ! मागच्या वेळेला कोण बरे ते इंडियाला शायनिंग होण्याचे रिझन देत होते तू आम्हाला स्मायलिंग रिझन देऊन त्यांची रीऽऽऽ खेच म्हणजे झालं.

रिकी पॉंटींग

थोडी गडबड झालीये हे मान्य, पण म्हणून कोणी आम्हाला गृहित धरणार असेल तर मग मी एवढंच म्हणेन बीट अस इफ यू कॅन!

प्रति रिकी

अरे तू इतरांचं बोलणं थोडं तरी मान्य केलस आम्ही धन्य झालो. असो, क्रिकेट, बेसबॉल, टेनिस, बॅडमिंटन सर्व प्रकारच्या बॅटी आणल्यात तुला बीट करायला. बोल कधी भेटतोस, हात जाम शिवशिवत आहेत.

सुनिल गावस्कर

इतकी पॅशन फक्त आपल्या देशातच पाहायला मिळते. राहुल ऍन्ड बॉइज ब्रिंग बॅक द कप व्हेअर इट बिलॉंग्ज.

प्रति गावस्कर

सकाळी सकाळी घेतली मध्ये आहात का हो? पॅशन नाही फॅशन म्हणायचे वाटते तुम्हाला? जरा  ढोणी, इरफानकडे बघा आणि कपाची जहागिरदारी भारताला कधी मिळाली?  उगीच टुरटुर!

अनिल कुंबळे

वर्ल्डकप नंतर मी एकदिवसीय सामने खेळणार नाही. वाढत्या वयाची गोष्ट तुम्ही अमान्य करू शकत नाही. जॉन्टी र्‍होड्सप्रमाणे मी क्षेत्ररक्षण करावं अशी तर तुमची अपेक्षा नाही नं!

प्रति कुंबळे

हो रे राजा चुकतंच बघ आमचं. आम्हीच या ३५-३६-३७ वर्षांच्या फळीकडून उत्तम आणि अनुभवी क्रिकेट मिळण्याची अपेक्षा करतो, पण वर्ल्डकपनंतर तुला बोलावतंय कोण एकदिवसीय सामने खेळायला?

कपिलदेव

निवड समितीने उत्कृष्ट संघ निवडलाय पण एकदिवसीय सामन्यात विजय पराजय त्या त्या दिवसातल्या बर्‍याच गोष्टींवर अवलंबून असतो. ठरवून काही करता येत नाही.

प्रति कपिल

बरोबर बोललास रे देवा! आम्ही ठरवलंय की एप्रिलच्या २८ तारखेपर्यंत सगळी देवळे पालथी घालायची. खंडोबा, वेतोबा, जगदंबा सर्वांना जोडीने येतो असा नवस बोललोय. दर मंगळवारी गणोबा दर्शनालाही जायचं म्हणतोय तेव्हा चांगल्या खेळाची गरज नाही… देव तारी त्याला कोण मारी नाही का?

****

“अरेच्चा! खरंच रागावलेले दिसताय तुम्ही. म्हणजे अगदी वैतागून दिलेली उत्तरे दिसली, पण ती भारतीय संघापर्यंत पोहोचायची कशी?”  किती प्रश्न पडतात हिला.

“सोपंय! आम्ही याची एक कॉपी आमच्या लाडक्या मंदिराला पाठवतोय आणि वाच गं बाई जरा आमच्यासाठी अशी गळ घालतोय.”

परमालिंक टिप्पणी करे

जागतिक महिला दिन

मार्च 8, 2007 at 1:57 अपराह्न (टवाळकी, स्फुट)

जागतिक महिला दिन आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करतो, अगदी झोकात! कारण अचानक आम्हाला ८ मार्चला आपण बाई नसल्याचा जाज्वल्य अभिमान दाटून येतो. 

या दिवशी स्त्रियांची आर्थिक, सामाजिक आणि राजकिय क्षेत्रातील कामगिरी जगासमोर मांडली जाते, त्यांची वाहवा होते, सत्कार होतो.  स्वत: स्त्रिया हिरिरिने पुढे येऊन आपली कामगिरी जगाला सांगतात. स्त्रियांनी कसे मोठे व्हावे, आपली उन्नती कशी करावी याचे दाखले देतात.

हे सर्व पाहिले की आम्हाला गावाकडे बैलांचा सण असतो, पोळा; त्याची आठवण होते. (वाईट डोकं आहे आमचं!)  यादिवशी बैलाला सजवले जाते, झूल घातली जाते, त्याची पूजा केली जाते, त्याला नैवेद्य दाखवला जातो आणि दुसर्‍या दिवशीपासून पुन्हा आसूडांनी पाठ रंगवली जाते. नाही, स्त्रियांची परिस्थिती तितकी भीषण नाही, निदान शिकल्या सवरलेल्या स्त्रियांची तरी नाही हे सांगायला स्त्रियाच पु्ढे येतील पाहा. त्या सर्व स्त्रियांना आमचे काही प्रश्न आहेत —

१. मला H1 मिळतोय. तू तुझी नोकरी सोडून माझ्याबरोबर चलतोस का रे अमेरिकेला H4 वर? असे कधी विचारले का हो तुम्ही तुमच्या यजमानांना?

२. मला प्रमोशन मिळतंय. पगार सॉलिड वाढणार आहे. तुझ्या नोकरीची आता गरज नाही रे. घरात मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे, तू नोकरी सोडतोस का रे? किंवा  मला फिरतीची नोकरी मिळते आहे, मी फक्त शनिवार-रविवार घरी येऊ शकेन. तू घर-मुलं सर्वांची काळजी घेशील ना रे?

३. ए आज ना मला पिठलं भाकरी खायचा जाम मूड आहे, थापतोस का रे दोन भाकर्‍या माझ्यासाठी?

४. मला नोकरी आणि राहतं घर सोडून समाजकार्य करायचे आहे, त्यासाठी मी आदिवासींच्या पाड्यात जाऊन राहणार आहे. नवरा म्हणून माझ्या खांद्याला खांदा लावून तू उभा राहशील ना रे? (उंबरठा चित्रपटातील स्मिता पाटीलांची आठवण झाली.)

५. माझे आई-बाबा म्हातारे झाले आहेत, त्यांच्याकडे पाहायला कोणी नाही. आपण आता त्यांच्याबरोबर त्यांच्याकडे राहू. तुला घरजावई म्हणून घेण्यात कमीपणा नाही ना वाटणार?

अपवादात्मक असे नवरे मिळणे अशक्य नसावे पण किती असतील, हाताच्या बोटांवर मोजण्या इतके? आम्हाला शंका वाटते. स्त्री ही आमची आई, बहिण, मुलगी, मैत्रिण असे उदात्त विचार मांडताना तिच्यावर नात्यांची बंधने तर नाही टाकत आम्ही?  बाबानो ती फक्त माणूस आहे; Human being – Homo sapian – इतकाच विचार पुरेसा का नाही?

असो. प्रश्न अनेक आहेत, आम्ही फक्त साधेसुधे ५ मांडले, पुढचे प्रश्न पलंगाच्या बाजूने जाणारे विचारायची गरजही नाही. बघा! या प्रश्नांची उत्तरे तुमचे यजमान काय देणार ते! त्यांची विकेट उडली नाही तर जरूर सांगा!

आम्हाला पुन्हा पुन्हा बरं वाटतं आम्ही बाईच्या जातीला जन्माला आलो नाही याचे…. कारण असे प्रश्न ऐकल्यावर आम्ही आमच्या पत्नीला कधी आवाज चढवून, कधी प्रेमाने रूंजी घालून तर कधी न ऐकल्यासारख करून धुडकावून लावलं असतं.

देवा रे! पुढची हज्जार वर्षे तरी आम्हाला बायकांचा जन्म नको 😉 … आम्ही या पुरूषांच्या जन्मात अत्यंत सुखी आहोत.

आपला(उपरोधिक)
बेधडक.

परमालिंक 10 टिप्पणियां

वर्‍हाड निगालंय मुंबैला

मार्च 7, 2007 at 2:05 अपराह्न (टवाळकी, स्फुट)

“अवं भाऊ! काल तर आला की मंग आज का म्हून मुंबैला परत जातूय?” दाजींनी आश्चर्याने विचारले.

“दाजी, ह्यो पेपर बगा! येक लगीनाची पार्टी हाय, चौपाटीवर.”

“आता रं? कुनाचं लगीन काडलं? आनि तेंचा फोटु प्येपरात? बगू मला?” दाजींनी वर्तमानपत्र हिसकावून घेतले. “ह्ये काय? ही तर कुनी विदेशी बाय दिसते की रं? यांच्या लगीनघाईत तू काय करनार रे बाप्या?”

“दाजी, म्या कुटं जानार त्या मोट्या लोकांच्या समारंभात? ह्ये लगीन विदेशातच झालं बगा पर मुंबईत पार्टी हाय मग राजस्तानात पुना लगीन हाय म्हनतात. आता म्या चौपाटीवर चने-शेंगदाने विकतुया न्हाय का,  चौपाटीवर लगीनाची पार्टी बगायला येनार्‍यांची ह्यी लाइन लागील बगा, त्येवडाच धंदा बरा व्हईल. निघतुच म्या!” भाऊ निघण्याची तयारी करायला लागला.

“आरं पन कोन लोक म्हनायचं ह्ये? वळखीचं नाय वाटंत.”

“ही बाय दिसते ना फोटुत,  तिचं नाव हाय लिज़ हर्ली आनि तिला खेटून तो बाप्या हाय तेचं नांव अरुन नायर, बिज़नेसम्यान हाय म्हनतात पर कदीपन या बायच्या कमरेत हात टाकून फिरतानाच दिसतूया. कंचा बिजनेस हाय काय म्हाईत? पर बडे लोक हायेत, सारखे फोटुत दिसत्यात.”

“आरं पन बडे मंजे कोन? काय क्येलं त्येनी आपल्या हितं, भारतात? कुनाची मदत केली? कोनाला तरास दिला? कोनाला चार पैसं उचलून दिलं? म्या तर कदी शिनेमात बी न्हाय पायलं तेस्नी.  राजकारनात सुदिक येकच विदेशी सून हाय. मग ही नवी सूनबाई कोन म्हनतुया मी?” दाजींना काही कळेनासे झाले होते. भाऊ मुंबईला गेलेला, ४ बुकं शिकलेला  हुशार मनुष्य, त्याला जगाची माहिती होती, मुंबईचे मराठी आणि दोन चार इंग्रजी वाक्येही तो लिलया बोलू शकत होता.

“ही शिनेमातलीच हाये पर आपल्या किस्ना, रंग दे बसंती आन त्या भागमभाग मदली बाय नाय. ही विदेशी शिनेमातच काम करतीया, म्या पायला होता मागं, आयटम बाई हाय, आन तो बाप्याबी विदेशातच राहतुया.”

“प्वारगी बरी हाय रे दिसाया, जोडा कसा लक्श्मी नारायनागत दिसतुया.” बायजाक्कानेही डोळे भरून वर्तमानपत्रावरचा फोटो पाहून घेतला.

“कसचं आलया लक्श्मीनारायन आक्का? लेकुरवाळी हाय ती आनि वय हाय येक्केचाळिस आन तो बाप्याबी दुसर्‍या लग्नाचा हाये.” भाऊंनी मौलिक बातमी पुरवली.

“काय म्हनतूस? मंग ह्यो इतका गाजावाजा कशापायी? तिचंबी दुसरं लगीन आसल का रं?… तुला सांगतुया आमच्या बायजाक्काला येक्केचाळिसाव्या वर्सी जावय आला व्हता. या परदेसातल्या बायका बाकी जंक्शन,  नायतर आमची बायजाक्का बगा, शेंगदान्याच पोतं बरं! आता सांग हिचं आपल्या पयल्या दादल्याशी काय बिनसलं?”

“अवं दाजी! हिला पयला नवराच न्हाय. मित्र व्हते दोन-चार. त्यातल्या येकाला तिनं सांगितलं की तूच माज्या प्वाराचा बाप! तो म्हनाला नाय मानत जा! बास! फाटलं की वं त्यांच. ”

“ह्ये घ्या! देसी नायतर विदेसी ह्ये विश्वामित्र समद्या जगात हाय म्हनायचं. बाप्यांची जातच मेली वंगाळ” दाजींच्या नसत्या टीप्पणीचा वचपा काढत बायजाक्काने तोंड उघडले.

“तू गप ग! दोन मान्स बोलत आसताना मदे मदे तोंड नगं खुपसू.” दाजीने बायजाक्काला दटावले.

“आरं भाऊ पर मला सांग हे दोगे लगीन करायला हितं का आले?”

“म्हायत नाय बा! त्या परमेस्वर आनि आदीने बोलावलं आसल.”

“ह्ये कोन परमेस्वरराव आनि आदीताई?” बायजाने पुन्हा तोंड घातले.

“आक्का! चुकलीस बग! परमेस्वर बाई हाय आनि आदी बाप्या. त्यानी चौपाटीवर मंडप टाकून लई जंक्शन तयारी केलीया लग्नाची.”

“आरं पर मला अजूनशान न्ह्याय कळलं की या दोगांनी येवडं मोटं काय केलंया की प्येपराच्या पयल्या पानावर तेंचे फोटु लावल्यात? आमचा बळीराजा आत्महत्या करतुयां, ती मुंबै-पुन्याची मानसं वीज टंचाईने कावली हायेत, ह्यी रोजची गुनेगारी वाढतीया, आनं ते समदं सोडून ह्ये दोगे का रं पयल्या पानावर?”

“आवं ह्यी मुंबै-पुन्याची मानसं अशा लोकास्नी ‘रोल म्वाडल’ म्हनतात. तेंच्यासारखं दिसायचं, वागायचं, बोलायचं मंजी रोल म्वाडल, मग त्यांचे फोटु नकोत का पयल्या पानावर?”

“आरं माज्या द्येवा! ह्यो बाप्या काडीमोड झालेला, ती बाय पोरास्नी घेऊन लगीन करतीया. चाळीशी उलटलेलं आनि तोकड्या कपड्यात झोंबाझोंबी करत फिरनारं ह्ये रोल म्वाडल?  आनि मग ते आपलं मेधाताई, अन्ना, ते अभय बंग, बाबा आमटे ह्ये कोन म्हनायचं? राजा, पेकाट म्वाडलं रे माजं या बाता आयकून आनि येक सांग यांचं लगीन टिकलं का रं?”

“दाजी तुमी अडानी मानूस! किती कावताय, कशाला नसत्या पंचायती करताय? आवं आमच्या पुन्या-मुंबैची मानसं बी इतका इचार न्हाय करत. गुमान टिवी, प्येपरात या दोगांना बगतात आनि बातम्या चगळतात, तुमी या टिचभर गावात राहून कशापाय तरास करून घेताय? सोडा की वं राव, या मी तुमाला या दोगांच्या ड्रायवरची, घरगड्याची मुलाखत आलीया प्येपरात ती वाचून दावतो आनि मग मुंबैची एसटी पकडतो, कुनाला म्हाइत उद्या चौपाटीवर पार्टी व्हताना चने शेंगदाने विकनारा म्हनून ह्ये टिवीवालं माजीबी मुलाखत घीतील.”

 ****

परमालिंक 4 टिप्पणियां

क्योंकी सांस भी कभी….

फ़रवरी 28, 2007 at 12:54 अपराह्न (टवाळकी)

वेळ — सकाळी ११ ची.
स्थळ —  स्वयंपाकघर.
काळ — अगदी आताचाच, पुढच्या महिन्यातला नाही तर त्याच्या पुढच्या.

स्वयंपाकघरातून हिंग, कढीपत्ता, मोहरीची चरचरीत फोडणी दिल्याचा आवाज आणि घमघमाट सुटला होता. वास जयाकाकूंच्या नाकात भिनला होता. त्यांनी आपल्या नाकावर पदर दाबून धरला आणि तरातरा त्या स्वयंपाकघरात शिरल्या. ऐशू कपाळावरची बट हलकेच बाजूला सारून घर्मबिंदू आपल्या पदराने टिपत होती आणि गॅसवरच्या पातेल्यात डोकावत काहीतरी ढवळत होती आणि ‘दय्या दय्या दय्या रे!’ असं काहीसं गुणगुणत होती.

जयाकाकूंनी तिला तावातावाने  विचारले,”तुमी कि कोरो, बहु?”

“येन अम्मा? ” ऐशू तालात म्हणाली, “अभीसाठी बिस्सिबेळेअन्ना आणि रस्सम बनवते आहे.”

“छी! छी! अम्मा बिम्मा म्हणू नकोस मला आणि अभी रस्सम, फस्सम नाही खात. त्याला छोलार दाल, माछ, भप्पा दोई सगळे बंगाली पदार्थ आवडतात हो.” जयाकाकू ठसक्यात म्हणाल्या.

“भप्पा म्हणजे ते तुमचे भप्पी लाहिरी त्यांचे चिरंजीव का?” ऐशूने आपले सामान्यज्ञान पाजळले.

भस्सकन कुकरची वाफ निघावी तशा जयाकाकू फुदफुदल्या,”भप्पा म्हणजे वाफवलेलं. स्टीम्ड! काय बाई तरी अक्कल आहे.”

“हे पाहा माझी अक्कल काढायचं कारण नाही. विश्वसुंदरीचा किताब आहे माझ्याकडे तो काही केवळ माझ्या तोंडाकडे आणि फिगरकडे पाहून नाही दिलाय,” ऐशूच्या नाका, तोंडा, कानातून वाफा यायच्या बाकी होत्या, “अभीपेक्षाही माझी अक्कल जास्त आहे हे सगळ्या जगाला माहित आहे.”

“हो तर! एकतर तू त्याच्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिले आहेस त्यामुळे तुझी अक्कल जास्त असायचीच आणि दुसरं म्हणजे अभीने तुझ्याशी लग्न करायचं ठरवलं तेव्हाच जगाला कळलं हो की त्याची अक्कल किती आहे ते,” जयाकाकूंनी कुजकट टोमणा मारला.

ऐशूच्या हिरव्यागार टपोर्‍या डोळ्यांत पाणी तरारले. आपला लोरिएलचा कलर फॅब्युलस मस्कारा त्या अश्रूंत विरघळणार नाही याची पुरेपुर काळजी घेऊन तिने आपले डोळे टिपले.

“एंक गोत्थु! तुमच्या मनात ती बंगाली राणी होती, मी अभीला गटवलं म्हणून तुमची धुसफुस सुरू असते.”

“हो तर! तुम्ही मद्रासिणी सगळ्याच तरबेज आहात पुरूषांना गटवण्यात. हेमा, श्रीदेवी, जयाप्रदा, तू”

“मस्त उपकारा!”, फणकार्‍याने ऐशू म्हणाली,”मी मद्रासी नाही पण तुम्हा उत्तर भारतीयांना ते सांगून फारसा उपयोग नाही म्हणा, आणि अम्मा! रेखाआंटीला विसरलांत का हो? ” आपल्या पापण्या फडफडवत ऐशूने लाडिक आवाजात विचारले.

जयाकाकूंना काय बोलावे सुचत नव्हते, संतापाने त्या धुसफुसत होत्या, “हे पहा आमच्या घरात राहायचं तर मिळून मिसळून राहावं लागेल.”

ऐशूने नाकाचा लाल झालेला शेंडा ओढला आणि सूंऽऽ असा दीर्घ श्वास घेऊन ती म्हणाली,”पुढल्यावेळी त्या ऑप्र्हा विन्फ्रीने मला बोलावलं ना तर तिला मी सरळ सांगणार आहे की आम्हा भारतीय बायकांना आपल्या आईवडिलांच्याच नाही तर सासू-सासर्‍यांच्या कह्यातही राहावे लागते. अजूनही या पारंतंत्र्यात खितपत पडलो आहोत आम्ही. एवढी हिर्‍यासारखी सून मिळाली तर त्याचे कौतुकही नाही तुम्हाला.”

“कौतुक आहे की पण हा हिरा है सभी के लिए त्याचं काय? तुझ्यासारख्या भारतीय बहुपेक्षा एखादी विदेशी बहु आणली असती तर परवडलं असतं पण विदेशी बहु म्हटलं की अमितच्या तळपायाची आग मस्तकाला जाते.” खट्टू होऊन जयाकाकू म्हणाल्या.

“जाणारच! त्यांनी तुम्हाला ‘लाभाचे पद’ म्हणून राज्यसभेचा राजीनामा द्यायला लावला, आणि मी; नाही तुम्हाला या स्वयंपाकघराचा राजीनामा द्यायला लावला तर पहा.”

आता डोळे टिपण्याची पाळी जयाकाकूंची होती. तेवढ्यात मागून तेजींचा आवाज आला,”घरोघरीच्या सविता आणि तुलसी तुमची जुगलबंदी संपली असेल तर ताटं वाढायला घ्या हो! अमित आणि अभी यायची वेळ झाली, या तुमच्या “बा”ने सर्वांसाठी पंजाबी खाना कधीच पकवला आहे.”

परमालिंक 4 टिप्पणियां

आजचे राशिभविष्य

फ़रवरी 26, 2007 at 12:19 पूर्वाह्न (फालतू विनोद)

आजच्या महाराष्ट्र टाईम्समध्ये हे भविष्य वाचले. हे भविष्य इतके बोगस असते तरीही लोक आवडीने ते वाचतात असा अनुभव आहे. नुसते वाचतच नाहीत तर आपापल्यापरीने त्याचा बादरायण अर्थ, संबंधही जोडून घेतात, हा असा —


मेष : धाडसाने काम
आज बायकोला नक्की सांगणार की तुझ्या स्वयंपाकाला माझ्या आईच्या हातची चव मुळीच नाही.

वृषभ : आथिर्क लाभ
बाबांना पॉकेटमनीसाठी पुन्हा गंडवलं. 😉

मिथुन : नवीन कपडे घ्याल.
नवी जीन्स पाहून ठेवली आहे. कात्रीने ढोपरावर आणि मांड्यांवर कापली तर झ्याक दिसेन मी.

कर्क : खर्च वाढेल.
मी या जीन्स विकत घेणार्‍या पोरीचा बाबा. 😦

सिंह : मित्र भेटेल
हम्म! कोण येणार आहे आज गळ्यात पडायला? की मलाच कोणाला तरी कापायला हवं?

कन्या : बढतीचा योग
कालच शेजारच्या इमारतीतल्या संजनाचा फोन होता, “मैं तुम्हारे बच्चे की माँ बननेवाली हूँ।”

तूळ : पोटाची काळजी घ्या.
 संजनाची रास

वृश्चिक : उगाच चिंता
सांग सांग भोलानाथ, राज-उद्धवाची बनेल काय?

धनु : कौटुंबिक सुख
बायको पोरांना घेऊन माहेरी गेली आहे.

मकर : उत्साहाने काम
बाजूच्या वेंकटच्या इमेलचा पासवर्ड सापडला.

कुंभ : उपासनेत व्यत्यय
आत्ता बाटली ओपन केली आणि कोण उपटलं यावेळी?

मीन : विरोधकांचा त्रास
आमच्या अनुदिनीला प्रतिसाद न येण्याचे मुख्य कारण.

आपला (फलज्योतिषी),
बेधडक.

परमालिंक 4 टिप्पणियां

तिसरे पान

फ़रवरी 22, 2007 at 11:59 अपराह्न (टवाळकी)

हे तिसरे पान म्हणजे एक अजब प्रकार असतो. यापानावर काय काय वाचायला मिळेल आणि काय काय बघायला मिळेल याची कल्पना साक्षात ब्रह्मदेवालादेखिल करता येणार नाही. या पानावर ज्यांची चित्रे झळकतात, बातम्या झळकतात ते मनुष्यप्राणी आपल्या पोटापाण्यासाठी नक्की काय करतात हे अद्याप आम्हाला समजलेले नाही.

कळले आहे ते इतकेच की सर्व समारंभांना, पार्ट्यांना या मंडळींची वर्णी अत्यावश्यक असते. केसांच्या आणि कपड्यांच्या झिंज्या, एकमेकांशी झोंबाझोंबी करताना काढलेली प्रकाशचित्रे आणि काहीतरी अर्तक्य सनसनाटी बातम्या यांनी हे पान भरलेले असते.  गेल्या काही दिवसांतील लक्षात राहिलेल्या बातम्या पुढीलप्रमाणे —

  1.  ब्रिटनी स्पिअर्सचे टक्कल
  2. संजूची मान्यता
  3. बिपाशा आणि जॉनचे नवे भांडण
  4. सलमानची जुनी गर्लफ्रेंड
  5. ऍना निकोल स्मिथच्या मुलीचा नवा बाप
  6. अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाचा मुहुर्त
  7. मॉडेल १ आणि मॉडेल ४ चे मॉडेल २ आणि मॉडेल ८ शी भांडण आणि समझौता.**
  8. एकता कपूर यांची क च्या बाराखडीतील नवी मालिका
  9. शाहरूख पुत्र करणला मावशी म्हणतो की रितुपर्णोला?
  10. शोभा डे मराठीत बोलल्या.

 हाय रे आमच्या कर्मा!

 ** त्या मॉडेल्सची नावे कोणाच्या लक्षात राहत असतील तर कृपया कळवा.

आपला (त्रिदळ),
बेधडक
 

परमालिंक 6 टिप्पणियां

चोर सोडून…

फ़रवरी 20, 2007 at 2:16 अपराह्न (स्फुट)

गर्भात किंवा जन्मत:च मुलींना मारले जाऊ नये म्हणून सरकारने अभूतपूर्व निर्णय घेतला आहे.  

म.टा. मध्ये ही बातमी वाचली ती  येथे वाचा.

काय पण अफलातून तोडगा शोधून काढलाय आमच्या सरकारने. पोरं जन्माला घालायची कोणी? त्यात पोरी असल्या तर त्यांच्या नरड्याला नखं लावणार हे नराधम आणि त्यांच्यावर दया दाखवल्यागत त्यांच्या मुलींचा सांभाळ आमच्यासारख्या नेभळट करदात्यांच्या पैशांनी करणार आमचे सरकार. वा! वा! शाब्बास!

काही दिवसांनी ज्यांना अपत्य नाही किंवा एकच अपत्य, तेही मुलगा असलेल्या कुटुंबांवर सरकारने जबरदस्ती करून या मुलींना दत्तक घ्या असा फतवा काढला नाही म्हणजे मिळवले.

परमालिंक 2 टिप्पणियां

माहेरची साडी

फ़रवरी 16, 2007 at 1:19 अपराह्न (स्फुट)

आज सकाळपासून काय वाचलं? एक चित्रपटाचे टुकार परीक्षण, दोन चार जुन्या-पान्या ओल्याचिंब आठवणी, दोन-चार आईच्या हातच्या पाककृती आणि यासर्वांना लोकांनी डोळे टिपून दिलेली मनापासूनची पावती. जग कोठे चाललंय आणि आम्ही कोठे रमलोय?

शब्द लक्षात घ्या – रमलोय 😉 म्हणजे आम्हीही जगाबरोबर चालतो – बरिस्तामध्ये बसून हातात न परवडणार्‍या कॉफीचा कप धरून शेजारच्या स्पॅगेटी टॉप घातलेल्या पोरीला वरून खालून न्याहाळतो आणि कागदावर नऊवारी साडी नेसणार्‍या आपल्या आजीचे वर्णन लिहितो.

मराठी चित्रपटात उमा, आशा काळे, जयश्री गडकर, लीला चिटणीस यांनी प्रेक्षकांना धो धो कसे रडवले आणि अभिनयाची उंची 😉 कशी गाठली ते आताशा आम्हाला समजत आहे.

पुढील काही दिवसांत महाजालावरील मराठी साहित्यात आम्हाला काय वाचायला मिळणार याची एक यादी खाली देत आहोत –

  1. माझी शाळा
  2. शाळेतल्या मारकुट्या बाई
  3. धोंडू शिपाई
  4. बाहेरची थोडी 😉 (कविता)
  5. आईच्या हातचे धपाटे (पाककृती)
  6. मी चहा-पोहे खातो
  7. जिस देस में गंगा बहती है (चित्रपट परीक्षण)
  8. पु. लं.ची आठवण
  9. माझी स्मृतीचित्रे
  10. अभिश्वर्या आणि मी

काही राहिले असेल तर कळावे,
आपला,
(डोके पिकलेला) बेधडक

परमालिंक 6 टिप्पणियां

कॉफी मशिन

फ़रवरी 13, 2007 at 3:13 अपराह्न (स्फुट)

आमचे वय काही फार नाही. स्वत:चा आदरार्थी उल्लेख केला की बरेचजण आम्हाला बाबा आदमच्या काळातला एखादा बुवा समजत असावेत. फारसे काही माहित नसताना कल्पनेचे किल्ले लढवायची भारी वाईट खोड असते लोकांना त्याला काय करणार “आम्ही”!!

अभी तो मैं जवाँ हूँ।
दो चार बच्चोंका बाप हूँ।

हम्म! तर सांगणे जैसी बात म्हणजे आमचा मोठमोठी हापिसे आणि इतर धंद्यांच्या ठिकाणी कॉफी यंत्रे बसवण्याचा धंदा आहे आणि आम्ही तो इमानेइतबारे करतो, धंद्यात बरकतही आहे. आता परवा बर्‍याच वर्षांनी एक मित्र भेटला आणि आम्हाला ‘काय करता आजकाल?’ असा महत्वाचा प्रश्न विचारून गेला. आम्ही त्याला आमच्या नव्या धंद्याबद्दल सांगितले तसा म्हणाला, “लेका! मला अद्याप एकाही पोरीला कॉफी पाजता नाही आली आणि तू आख्ख्या ऑफिसला कॉफी पाजतोस?”

आता हल्लीच्या स्लँगमध्ये ‘कॉफी पाजण्याला’ जर विचित्र अर्थ असेल तर मग आमचा धंदा ….. नको पुढचे वाक्य प्रशस्त नाही.

लोक आपल्याला हवे ते अर्थ काढतात आणि आमच्यासारख्या सज्जन 😉 माणसाची पंचाईत करतात हेच खरे!

परमालिंक टिप्पणी करे

पालथ्या घड्यावर पाणी

फ़रवरी 12, 2007 at 3:30 अपराह्न (स्फुट)

लोकसत्तेतल्या लोकमुद्रेतील एका लेखाची लिंक देत आहोत. लेखाचे नाव आहे ‘सत्यदर्शनाने डोळे उघडणार की मिटणार?’ ब्राह्मण आणि त्यांना प्रिय असणारा मांसाहार याबाबत सुरेख विवेचन या लेखात आहे.

  ‘सत्यदर्शनाने डोळे उघडणार की मिटणार?’

लेखक महाशय बहुधा पावर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंगवर मोठा भरवसा ठेवून असावेत. आम्ही आमच्या आयुष्यातील सर्वात सोनेरी दिवसातही इतके ऑप्टिमिस्टिक होऊ शकत नाही. ही लिंक येथे दिल्यावर आमचे कुमार केतकर नाही झाले म्हणजे मिळवले. 🙂

आता सांगा, सत्यदर्शनाने डोळे कसे काय उघडणार कारण ज्यांनी डोळ्यांवर झापडे ओढून घेतली आहेत त्यांना डोळे उघडून तरी समोर काय दिसणार? अंधारच ना!!!! 😀

परमालिंक टिप्पणी करे

« Previous page · Next page »