आय हिक्क!

जून 23, 2007 at 1:05 अपराह्न (फालतू विनोद)

“आय हिक्क!…… आय हिक्क!” बबन्याच्या उचक्यांना उधाण आले होते.

“आरं! पानी पी की तांब्याभर, किती उचकी लागलीया?” बायजा कावून म्हणाली.

“आये! पानी प्यालं की गं, पन ही उचकी लई भारी दिसतीया, जायचं नावच काढीना. आय..हिक्क!”

“उचकी हाय. ती कायमची न्हाय राहायची… यील सतवील आनी जायील गुमान.”

“आगं आये! तुला काय म्हाईत न्हाई बगं! ही उचकी जानार्‍यातली न्हाई. ती हितंच असतीया, अदनंमदनं तिला उबळ येतीया…आय हिक्क!… ही अश्शी.”

“जानार्‍यातली न्हाई, हितचं असतीया, म्हंजी काय रं बबन्या? आसं येड्यावानी काय बोलतुया?” एव्हाना बायज्जाक्काला काळजी वाटायला लागली.

“आगं! येड्यावानी न्हाई आये. हा उचकी हितंच असतुया, अजीर्न झालं की आय..हिक्क म्हनत भायर पडतुया.”

” बबन्या तुजं काय खरं न्हाय… हा उचकी? आरं उचकी बाईवानी असतीया. ही उचकी म्हनतात.”

“आये सांगितलं ना तुला… ह्ये उचकी प्रकरन जंक्शन हाय. हा की ही त्येच कळेनासं झालंय…. ह्या उचकीचा माग लागत न्हाई तोवर आय…हिक्क ‘चांगभलं!! सदानंदाचा येळकोट!’ आसं म्हनायचं आनि गप्पगुमान राहायचं इतकच आपल्या हातात हाय….. आय हिक्क!”

 “आरं माज्या कर्मा काय बोलतुस रं लेका? सकाळच्या पारी काय तरी वंगाळ पिऊन न्हाईना आलास?” पोरगा काय बोलतोय ते बायजाच्या डोक्यावरून जात होते.

बबन्या गालात हसला. काहीतरी बोलायला म्हणून त्याने तोंड उघडलं तशी पुन्हा उचकी आली.

“आय…हिक्क!”

परमालिंक 3 टिप्पणियां

पुण्यदान

मार्च 24, 2007 at 12:08 अपराह्न (फालतू विनोद)

भारतीय संघाला पळवून नेले आहे आणि ५० करोड रुपयांची मागणी केली आहे. दोन दिवसांत पैसे मिळाले नाही तर संघाला पोत्यात घालून अरबी समुद्रात बुडवण्यात येईल. (बिशनसिंग बेदींवर दाट संशय आहे आमचा)  तेव्हा तातडीने मदत पाठवा..

असा भ्रमणध्वनी संदेश आम्हाला सकाळीच आला.

आम्ही तातडीने पोती आणि मुसक्या आवळायला दोरखंड पाठवले आहेत. 🙂

आपला,
(जल्लाद)बेधडक.

आमचा विश्वचषकी त्रागा -३

परमालिंक 5 टिप्पणियां

आजचे राशिभविष्य

फ़रवरी 26, 2007 at 12:19 पूर्वाह्न (फालतू विनोद)

आजच्या महाराष्ट्र टाईम्समध्ये हे भविष्य वाचले. हे भविष्य इतके बोगस असते तरीही लोक आवडीने ते वाचतात असा अनुभव आहे. नुसते वाचतच नाहीत तर आपापल्यापरीने त्याचा बादरायण अर्थ, संबंधही जोडून घेतात, हा असा —


मेष : धाडसाने काम
आज बायकोला नक्की सांगणार की तुझ्या स्वयंपाकाला माझ्या आईच्या हातची चव मुळीच नाही.

वृषभ : आथिर्क लाभ
बाबांना पॉकेटमनीसाठी पुन्हा गंडवलं. 😉

मिथुन : नवीन कपडे घ्याल.
नवी जीन्स पाहून ठेवली आहे. कात्रीने ढोपरावर आणि मांड्यांवर कापली तर झ्याक दिसेन मी.

कर्क : खर्च वाढेल.
मी या जीन्स विकत घेणार्‍या पोरीचा बाबा. 😦

सिंह : मित्र भेटेल
हम्म! कोण येणार आहे आज गळ्यात पडायला? की मलाच कोणाला तरी कापायला हवं?

कन्या : बढतीचा योग
कालच शेजारच्या इमारतीतल्या संजनाचा फोन होता, “मैं तुम्हारे बच्चे की माँ बननेवाली हूँ।”

तूळ : पोटाची काळजी घ्या.
 संजनाची रास

वृश्चिक : उगाच चिंता
सांग सांग भोलानाथ, राज-उद्धवाची बनेल काय?

धनु : कौटुंबिक सुख
बायको पोरांना घेऊन माहेरी गेली आहे.

मकर : उत्साहाने काम
बाजूच्या वेंकटच्या इमेलचा पासवर्ड सापडला.

कुंभ : उपासनेत व्यत्यय
आत्ता बाटली ओपन केली आणि कोण उपटलं यावेळी?

मीन : विरोधकांचा त्रास
आमच्या अनुदिनीला प्रतिसाद न येण्याचे मुख्य कारण.

आपला (फलज्योतिषी),
बेधडक.

परमालिंक 4 टिप्पणियां