उबग
’लोक तरी साले काय असतात एक एक? एथिक्स नावाची गोष्टच शिल्लक उरलेली नाही.’ सायबाने आज जोड्याने हाणली होती ते त्याच्या डोक्यातून काही केल्या जात नव्हते. पुडीतले शेवटचे दोन चणे त्याने घशात ओतले आणि पुडी चुरगळून रस्त्यावर भिरकावून दिली. घरापाशी आल्यावर त्याने आपले तोंड शर्टाच्या बाहीला पुसले. गल्लीच्या तोंडाशी कचर्याचा हा एवढा ढीग पडला होता. म्युनिसिपालटीची गाडी कचरा न्यायला आलीच नव्हती. लोकांनी घरात साचलेला कचरा आणून गल्लीच्या तोंडाशी टाकला होता.
’रस्त्यावर कचरा टाकतात. सुधारणार नाहीत लेकाचे.’ त्याने तोंड वेंगाडून नाक दाबले तरी नाक हुळहुळायचे थांबले नाही. “आक्छी! आक्छी!’ कचर्याच्या सुवासाने नाक साफ झाले. हाताला लागलेला शेंबूड कुठे पुसावा हे त्याला कळेना. इमारतीच्या भिंतीपेक्षा चांगली जागा त्याला दिसली नाही तशी त्याने हात भिंतीला पुसून घेतले.
घराच्या पायर्या चढता चढता त्याला सकाळच्या भांडणाची आठवण झाली. ’बायकोला कैदाशीण म्हणालो होतो नाही?’ आता कोणत्या पिंजर्यात रवानगी करते कोणास ठाऊक? कपाळावरचा घाम पुसत त्याने बेल दाबली. दरवाजा उघडला तसे त्याने थेट बाथरूम गाठले आणि पाण्याचे दोन तांबे डोक्यावर रीते केले. ’काहीतरी कारण काढून या ब्यादेचे तोंड बंद ठेवायला हवे. कटकट साली. बोलायला लागली की नको जीव करते.’ डोकं खसाखसा पुसत बाहेर येत त्याने खुंटीवरचे जानवे काढले आणि गळ्यात घातले.
’च्यामारी! डाव्या खांद्यावरून घालायचे की उजव्या?’ मनात विचार करत त्याने गजानन महाराजांची पोथी काढली आणि मनोभावे वाचायला सुरुवात केली.
’आज काय नवं नाटक? देवभक्तीचं?’ कानावर टोमणा आला तसे त्याने दुर्लक्ष केले आणि वाचन सुरु ठेवले. एव्हाना बायकोच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला होता. ’जळ्ळा मेला जन्म बायकांचा! या पुरुषांनी उठावं आणि काहीही बोलावं….’ त्याने वाचताना एक उसासा सोडला.
’ट्रींग…’ दाराची घंटा वाजली तशी त्याच्या मनाला उभारी आली. कोणीतरी घरी आलं होतं, चला त्यानिमित्ताने हिचं तोंड गप राहील. तो धडपडत उठला आणि दार उघडायला गेला.
’कोण होतं?’ त्याला दरवाजा बंद करताना पाहून बायकोने विचारलं.
’पोष्टमन!’ त्याने हिरमुसले होऊन उत्तर दिलं.
’पोष्टमन या वेळेला?’
’ओवरटाईम करतात म्हणाला. जाऊ दे! कोणतीतरी बिलं आली होती माझ्या नावावर ती द्यायला आला होता. जेवायला बसूया का?’ त्याने नरमाईने विचारलं.
’अडलंय माझं खेटर! सकाळचं भांडण विसरलात का? राहा आज उपाशी.’ ती नेहमीप्रमाणे तावातावात.
’आं? खेचर… हा खेचर कसा उपटला?’ त्याने कपाळाचा घाम पुन्हा एकदा पुसला.
’कान घ्या तपासून… नाहीतर असं करा डोकंच घ्या तपासून.’ ती फुरंगटली की जरा जास्तच जाडी दिसायची.
काही न बोलता तो गुमान गादीवर पडला आणि डोक्यावर चादर ओढून चुपचाप पडून राहिला. डोकं भणाणत होतं, पोटात कावळे कोकलत होते, हात आणि तोंड शिवशिवत होतं पण त्याला या सर्वाचा “उबग” आला होता. ’आज काही न बोलता झोपूया सालं! आजचा दिवसच वाईट गेला. उबग आलाय सर्वाचा… उद्या नवा दिवस सुरु झाला की बघून घेईन एकेकाला.’ … आणि तो डोळे मिटून घोरण्याचं नाटक करू लागला.
भिंत देता का भिंत
आजच्या लोकसत्तेत एक बातमी वाचली – दीवार मधील अमिताभच्या तोंडचा संवाद “साब पैसे उठाकर हातमें दीजीये, मैं फेके हुए पैसे नहीं उठाता।” हे चक्क सातवीच्या समाजशास्त्र आणि राजकीय जीवन या विषयाच्या पुस्तकात छायाचित्रासकट टाकले आहे. हे वाचून आम्ही धन्य झालो. इतर चित्रपटांच्याबाबतीत आपपरभाव होतो आहे की काय अशी शंका आमच्या पापी मनाला चाटून गेली. आमचे काही आवडते संवाद कोणत्या विषयांत चपखल बसतील ते पाहा –
१. चिनायसेठ, जिनके खुदके घर शीशेके होते है वोह दुसरोंपर पत्थर फेंका नहीं करते। – भौतिकशास्त्र.
२. जबतक बैठने को ना कहा जाये खडे रहो। ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बापका घर नहीं। – नागरिकशास्त्र.
३. कितने आदमी थे? सरकार २। वो दो थे और तुम तीन…. सोडवा गणित. 😉
४. एक लडका और लडकी कभी दोस्त नहीं हो सकते। – रसायनशास्त्र.
५. ये हाथ मुझे दे दे ठाकूर। – कार्यानुभव.
६. मैं तुम्हारे बच्चेकी मॉं बननेवाली हूँ। – जीवशास्त्र.
यांनाही कोठेतरी स्थान द्या हो. आवडतात आम्हाला हे संवाद.
तुमच्याकडे असे संवाद विषयांसकट असतील तर कळावे,
आपला,
बेधडक डोईफोडे.
(नाहीतर मग भिंत देता का भिंत असे कशाला मागत होतो? डोके फोडून घ्यायलाच की.)
उडता मामला
“काय सांगू बाई मिसेस श्रीवर्धन, इतका गब्रू जवान गेल्या कित्येक वर्षांत नाही पाहिला… आहाहा! ते त्याच्या समवेत उडणे, ते त्याचे गालातल्या गालात हसणे, ते कपाळावरले केस मागे सारणे, त्याची ती अदब, बोलण्यातली मिठ्ठास …कलिजा खलास. तुम्हाला म्हणून सांगते, त्याला सांगितलं की मी पहिल्यांदाच प्रवास करत्ये, जरा सीटबेल्ट लावून दे ना, प्लीऽऽज…. अस्स वाकून त्याने सीटबेल्ट लावला… हो हो! म्हणजे काय हे होते ना बरोबर, आपले विमानाच्या खुर्चीत न मावणारे शरीर इतर वेळेला गंजीफ्रॉकात आणि प्यांटीत खोचून बसवतात ना तसेच त्या खुर्चीत स्वत:ला कोंबून ढाराढूर झोपले होते…. प्रवासात माझी अशी बडदास्त होती की नाही, अगं बर्याच दिवसांनी ‘आंटी’ न म्हणणारा सुकुमार भेटला. दोन दोनदा तुम्हाला ड्रिंक हवं का विचारून गेला…. नाही गं कोल्डड्रिंक….इश्श! त्यांना का म्हणून सांगू, इतर वेळेला ते त्या बाहुल्यांबरोबर कसे वागतात ते सांगतात ना मला… काय काय कल्पनाविलास असतात बाई या पुरुषांचे…. मला बाई फक्त त्याच्या गालातल्या गालात हसण्याने गुदगुल्या झाल्या….नाही हो तसं म्हटलं मी यांना घरी आल्यावर की काय मसल्स होते, काय तगडा तरणाबांड होता… तर तर.. म्हणाले चळत्येस, किती वयाची झालीस ते विसरलीस की काय?….. वयाने इतक्या लहान पोराबद्दल असे काही बोलायला लाज नाही वाटली….. हट! आपण नाही विचारत असल्या दटावणीला….इतकी वर्षं यांनी मजा केली, काय काय वर्णने त्या बायांची… आणि मी बापडीने एकदा डोळे भरून पाहिले तर चळते म्हणे..या पुरुषांच्या दुटप्पीपणाचा अस्सा राग येतो, हे वर्णने करणार तेव्हा काय रसिक हो, किती दिलखुलास, किती जाण यांना सौंदर्याची असे म्हणायचे आणि आम्हा बायकांच्या आहाहा! लाही अश्लील म्हणायचे….जाऊ दे! सोडा हो, तुम्ही ही एक विमानप्रवास करून या… हे झोपले होते ना तेव्हा त्याच्या सर्व फ्लाईट्सचे शेड्युल घेतले आहे. कधी निघताय सांगा…”
मंदिराची साडी
“आवं उद्या पुन्याला जाऊया” बायजाक्काने गळ घातली.
“का वं? आसं एकदम उठून पुन्याला का?” दाजींनी प्रश्न केला.
“मला नवी साडी घ्यायची हाये.”
“आगं! पन तालुक्याच्या बाजारात मिळल की. त्यासाटी पुन्याला का जायचं?”
“मला पेशल साडी हवीय अवंदा. साडीवर पंढरी, कोल्हापूर, आट इनायक आनि म्हाराष्ट्रातील समद्या मोट्या मंदिरांची चित्र हवीत.”
“ऑं! आनि ती कशापायी?”
“आवं! आता आषाढी येकादशी येईल, नागपंचमी, गनपती, गौरी. आपल्याकडं सनासुदीला ह्ये इतकं दिवस हायेत, मंग पेशल साडी नगं का?”
“पर आसं मंदिरांचं फोटू चिकटवलेली साडी गावेल का?”
“न गावायला काय झालंया? त्या मंदिराला गावली की वं! ती बगा अंगभर देसांच झेंड लावून आली होती. काय झ्याक दिसते बाय! मला पन अशीच साडी हवी.”
“आस्स!!! आता कळतया की तुज्या टकुर्यात काय हाय ते आनि लोकांनी बोभाटा केला तर? मंजी सरळ सांगायचं तर बसायच्या जागंवर येखादं मंदिर आलं तर काय करायचं? मानसं बगून घेनार न्हाईत. शिमगा करतील.”
“ते का वं! मंदिरानं केलं तर कवतुकानं बगतात. म्या बाईने केलं तर कशापायी वरडतील?”
“नाय गं! मंदिरानं केलं तरी बी वरडतातच हायेत.”
“आनि त्यानं काय व्हनार ते सांगा? मंदिराला चार शिनुमे मिळतील, टिवीवरच्या दोन मालिका मिळतील. चेंडू-फळी तर आजकाल लोक तिच्यापायीच बगतात. मी सांगते ते आयकाच, मला साडी घिऊन द्या. लोकांनी ठनाना क्येला तरी नंतर फायदा माजाच हाय.”
“आता यात फायदा कोन्ता म्हनतू मी, बायजा?”
“आवं, निवडनूक हाय सरपंचाची. या टायमाला बाई सरपंच पायजे ना. तुमीच म्हनाला ना की तू उबी रहा म्हनून. आता मला बाईला कोन वळखतंय आनि मत देतयं? ह्ये लोकांनी आपल्याला वळखायंच मंजी कायतरी जंक्शन कराया लागतं बगा! मला साडी घिऊन द्या, न्हाय समद्या गावांत माजा बोलबाला झाला तर बगा.”
“बायजे! मानलं गं बाई तुला. आगं तू म्हनतेस त्यात प्वाईंट हाय बाकी. तुला उद्याच्या पैल्या गाडीने पुन्याला घिऊन जातू.”
कारणे द्या नोटिस – १
गेले काही दिवस आम्ही भयंकर व्यग्र होतो. आमच्या काही मित्रांना आम्ही काय करत होतो हे जाणायचे आहे या इच्छेतून इतक्या दिवसांत आम्ही कोणते पापड लाटले ते सांगणारे भाग उलट्या क्रमाने येथे टंकत आहोत.
तर, अगदी आता आतापर्यंत आम्ही “कारणे द्या” नोटीशीला उत्तर देत होतो. नाही! कोणाला कारणे द्यावीत असा आमचा पिंड नाही आणि असे आम्ही फारसे काही उपद्व्याप केलेलेही नाही परंतु आमच्या दोघा खास मित्रमैत्रिणींवर ही नोटिस बजावण्यात आली होती आणि त्यांनी उत्तरे लिहायची जबाबदारी आमच्या गळ्यात टाकली. त्यापैकी पहिल्या कारणे द्या नोटिशीला आम्ही दिलेले उत्तर:
ही नोटिस आमचे परममित्र अभिषेक बच्चन यांच्यावर करिश्मा कपूर यांनी बजावली होती. नोटिशीत, कधीकाळी मोडलेले लग्न आणि आता लग्नाला न आमंत्रित केल्याबद्दल कारणे विचारली होती. तेव्हा अभिषेकच्या वतीने आमचे उत्तर पुढीलप्रमाणे.
श्रीमती करिश्मा कपूर यांस,
गोष्ट जुनी झाली म्हणून बदलत नाहीत. लग्न तुम्ही मोडले आणि तेव्हा कारणे देताना तुम्ही अभिषेकचे टुकार चित्रपट, त्यांच्या वडिलांचे आताही प्रसिद्धी पावणारे चित्रपट, जयाकाकूंचे तुमच्यापेक्षा लांब असणारे केस, तुमच्या मातोश्री बबिताताई यांनी प्रतीक्षा बंगल्यात वेगळी खोली देण्यास परवानगी नाकारणे असे अनेक मुद्दे उठवले होते. असो, आमचेही काही प्वाईंट होतेच तेव्हा आता आम्ही आमच्यावतीने कारणे देतो….
१. लग्नानंतर आदर्श सूनबाई बनून राहणार नाही असा तुम्ही घेतलेला पावित्रा. आपण जे जन्मभर सहन केलं त्याचा वारसा आता सुनेने चालवावा अशी आमच्या जयाकाकूंची माफक अपेक्षा होती, त्याला तुमची नाराजी दिसली. आमची ऐशू पहा कशी अंगभर पदर पांघरून उभी असते. मध्यंतरी जयाकाकूंना लाइफ टाईम पुरस्कार मिळाला तेव्हा खाली बसून डोळ्यातून पाणी काढत होती पोरगी. तिने जसे आम्हाला ‘क्रेझी कर डाला’ तसे तुम्ही कधी केले नाही म्हणून.
२. आपला चिरका आवाज आणि सालीचा म्हणजे करिनाचा हो! (गैरसमज नको) चिरका आवाज यांनी जयाकाकूंचे ब्लडप्रेशर वाढत असे. जन्मभर ते सहन करण्याची ताकद थोरल्या डॅडीसाहेबांतही नव्हती. आता पुन्हा लग्नाला आमंत्रित करून मंगलाष्टकांच्या वेळेस तुम्ही भगिनीगान सुरू केले तर गोंधळ, पळापळ उडायला नको म्हणून आमंत्रण दिले नाही, इतकेच!
३. मागे लग्न ठरले तेव्हा आपल्या मातोश्रींनी भरभक्कम हुंडा देते असे कबूल केल्याचे आठवते. हुंड्यात भरभक्कम म्हणजे त्या स्वत: याची आम्हाला कल्पना नव्हती. ती आल्यावर आम्ही हादरून गेलो.
४. आपल्या पिताश्रींनी प्रतिक्षावरील एका बैठकीत थोरल्या डॅडीसाहेबांचा संपूर्ण बार निकामी केल्याचे (अर्रर्र! संपवल्याचे) लक्षात आल्याने हे प्रकरण आपल्यालाच काय पण प्रत्यक्ष कुबेरालाही परवडणारे नाही हे आम्हाला लक्षात आले.
५. लग्नातील आपल्या काही अटी फारच जाचक होत्या. जसे, लग्नात शाहरुखला पहिल्या रांगेत बसवून अमरसिंहांना पाचव्या रांगेत बसवावे. किंवा तुमच्या लाडक्या गोविंदाची आणि कॉंग्रेसपक्षाचे बोर्ड लग्नसमारंभात लावावेत. हे ही आम्हाला परवडण्यासारखे नव्हते.
एवढे मुद्दे पुरेसे असावेत असे आम्ही समजतो.
कळावे, लोभ असावा.
आपला,
(चमचा) बेधडक.
पुढचे उत्तर सल्लूला.
कर्मन्यास: यातील कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये. हे प्रसंग केवळ कपोलकल्पित आहेत.
आमचं खरमरीत उत्तर
आमचा विश्वचषकी त्रागा – १
“अहो काय हे? काय करताय काय?” आमच्या हिने वैतागून विचारले.
“आम्ही रागावलोय.” आमचे प्रामाणिक उत्तर.
“हो क्का? मग बेधडकराव कोणाला धडक देण्याच्या विचारात आहेत?”
“भारतीय क्रिकेट संघातील या प्रभृतींना. त्यांना आम्ही खरमरीत आमच्या धाटणीचे उत्तर पाठवणार आहोत.”
“हम्म! म्हणूनच कागदांचे बोळे टाकले आहेत वाटतं, मी आहे ना हक्काची मोलकरीण” ही वैतागली की मनापासून बरं वाटतं बघा!, “निदान काय खरडलंय ते तरी दाखवा.”
“हे घे वाच, नंतर टाकतो पोस्टात.”
राहुल द्रविड:
वर्ल्डकप जिंकणं ही सर्वाधिक आनंदाची गोष्ट झाली. तसं झालं नाही तरी आयुष्य काही थांबणार नाही. यू हॅव टु मूव्ह ऑन. सर्वोत्कृष्ट खेळ दाखवणे तुमच्या हातात आहे.
प्रति द्रविड:
बरोबर बोललात कॅप्टनसाहेब. यावरून आपली तयारी किती आहे ते कळलं हो आम्हाला. आम्ही आत्तापासूनच मूव्ह ऑन व्हायला लागलो आहोत आणि तुम्हाला काय हो, आयुष्य थांबत नाही, जाहिराती मिळायच्या थांबत नाहीत, समालोचन करण्याची संधी थांबणार नाही काहीच नसेल तर व्हा टिव्ही होस्ट आणि हसा खदाखदा! आम्ही आहोत ना दिवसभर खोळंबून तुमचा खेळ पाहायला.
सचिन:
आयुष्यात एकदातरी वर्ल्डकप खेळावा अशी माझी इच्छा होती. माझा पाचवा वर्ल्डकप असल्याचं माझं मलाच खरं वाटत नाहीये, बट वी वुड गिव्ह इंडिया अ रिझन टु स्माईल.
प्रति सचिन:
सच्चू कशाला फेकतोस लेका, आम्हाला मात्र हल्ली हा तुझा पाचवा वर्ल्डकप आहे हे पटू लागले आहे. तू इथून निवृत्त झालास की राजकारणात जाशील बघ! मागच्या वेळेला कोण बरे ते इंडियाला शायनिंग होण्याचे रिझन देत होते तू आम्हाला स्मायलिंग रिझन देऊन त्यांची रीऽऽऽ खेच म्हणजे झालं.
रिकी पॉंटींग
थोडी गडबड झालीये हे मान्य, पण म्हणून कोणी आम्हाला गृहित धरणार असेल तर मग मी एवढंच म्हणेन बीट अस इफ यू कॅन!
प्रति रिकी
अरे तू इतरांचं बोलणं थोडं तरी मान्य केलस आम्ही धन्य झालो. असो, क्रिकेट, बेसबॉल, टेनिस, बॅडमिंटन सर्व प्रकारच्या बॅटी आणल्यात तुला बीट करायला. बोल कधी भेटतोस, हात जाम शिवशिवत आहेत.
सुनिल गावस्कर
इतकी पॅशन फक्त आपल्या देशातच पाहायला मिळते. राहुल ऍन्ड बॉइज ब्रिंग बॅक द कप व्हेअर इट बिलॉंग्ज.
प्रति गावस्कर
सकाळी सकाळी घेतली मध्ये आहात का हो? पॅशन नाही फॅशन म्हणायचे वाटते तुम्हाला? जरा ढोणी, इरफानकडे बघा आणि कपाची जहागिरदारी भारताला कधी मिळाली? उगीच टुरटुर!
अनिल कुंबळे
वर्ल्डकप नंतर मी एकदिवसीय सामने खेळणार नाही. वाढत्या वयाची गोष्ट तुम्ही अमान्य करू शकत नाही. जॉन्टी र्होड्सप्रमाणे मी क्षेत्ररक्षण करावं अशी तर तुमची अपेक्षा नाही नं!
प्रति कुंबळे
हो रे राजा चुकतंच बघ आमचं. आम्हीच या ३५-३६-३७ वर्षांच्या फळीकडून उत्तम आणि अनुभवी क्रिकेट मिळण्याची अपेक्षा करतो, पण वर्ल्डकपनंतर तुला बोलावतंय कोण एकदिवसीय सामने खेळायला?
कपिलदेव
निवड समितीने उत्कृष्ट संघ निवडलाय पण एकदिवसीय सामन्यात विजय पराजय त्या त्या दिवसातल्या बर्याच गोष्टींवर अवलंबून असतो. ठरवून काही करता येत नाही.
प्रति कपिल
बरोबर बोललास रे देवा! आम्ही ठरवलंय की एप्रिलच्या २८ तारखेपर्यंत सगळी देवळे पालथी घालायची. खंडोबा, वेतोबा, जगदंबा सर्वांना जोडीने येतो असा नवस बोललोय. दर मंगळवारी गणोबा दर्शनालाही जायचं म्हणतोय तेव्हा चांगल्या खेळाची गरज नाही… देव तारी त्याला कोण मारी नाही का?
****
“अरेच्चा! खरंच रागावलेले दिसताय तुम्ही. म्हणजे अगदी वैतागून दिलेली उत्तरे दिसली, पण ती भारतीय संघापर्यंत पोहोचायची कशी?” किती प्रश्न पडतात हिला.
“सोपंय! आम्ही याची एक कॉपी आमच्या लाडक्या मंदिराला पाठवतोय आणि वाच गं बाई जरा आमच्यासाठी अशी गळ घालतोय.”
जागतिक महिला दिन
जागतिक महिला दिन आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करतो, अगदी झोकात! कारण अचानक आम्हाला ८ मार्चला आपण बाई नसल्याचा जाज्वल्य अभिमान दाटून येतो.
या दिवशी स्त्रियांची आर्थिक, सामाजिक आणि राजकिय क्षेत्रातील कामगिरी जगासमोर मांडली जाते, त्यांची वाहवा होते, सत्कार होतो. स्वत: स्त्रिया हिरिरिने पुढे येऊन आपली कामगिरी जगाला सांगतात. स्त्रियांनी कसे मोठे व्हावे, आपली उन्नती कशी करावी याचे दाखले देतात.
हे सर्व पाहिले की आम्हाला गावाकडे बैलांचा सण असतो, पोळा; त्याची आठवण होते. (वाईट डोकं आहे आमचं!) यादिवशी बैलाला सजवले जाते, झूल घातली जाते, त्याची पूजा केली जाते, त्याला नैवेद्य दाखवला जातो आणि दुसर्या दिवशीपासून पुन्हा आसूडांनी पाठ रंगवली जाते. नाही, स्त्रियांची परिस्थिती तितकी भीषण नाही, निदान शिकल्या सवरलेल्या स्त्रियांची तरी नाही हे सांगायला स्त्रियाच पु्ढे येतील पाहा. त्या सर्व स्त्रियांना आमचे काही प्रश्न आहेत —
१. मला H1 मिळतोय. तू तुझी नोकरी सोडून माझ्याबरोबर चलतोस का रे अमेरिकेला H4 वर? असे कधी विचारले का हो तुम्ही तुमच्या यजमानांना?
२. मला प्रमोशन मिळतंय. पगार सॉलिड वाढणार आहे. तुझ्या नोकरीची आता गरज नाही रे. घरात मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे, तू नोकरी सोडतोस का रे? किंवा मला फिरतीची नोकरी मिळते आहे, मी फक्त शनिवार-रविवार घरी येऊ शकेन. तू घर-मुलं सर्वांची काळजी घेशील ना रे?
३. ए आज ना मला पिठलं भाकरी खायचा जाम मूड आहे, थापतोस का रे दोन भाकर्या माझ्यासाठी?
४. मला नोकरी आणि राहतं घर सोडून समाजकार्य करायचे आहे, त्यासाठी मी आदिवासींच्या पाड्यात जाऊन राहणार आहे. नवरा म्हणून माझ्या खांद्याला खांदा लावून तू उभा राहशील ना रे? (उंबरठा चित्रपटातील स्मिता पाटीलांची आठवण झाली.)
५. माझे आई-बाबा म्हातारे झाले आहेत, त्यांच्याकडे पाहायला कोणी नाही. आपण आता त्यांच्याबरोबर त्यांच्याकडे राहू. तुला घरजावई म्हणून घेण्यात कमीपणा नाही ना वाटणार?
अपवादात्मक असे नवरे मिळणे अशक्य नसावे पण किती असतील, हाताच्या बोटांवर मोजण्या इतके? आम्हाला शंका वाटते. स्त्री ही आमची आई, बहिण, मुलगी, मैत्रिण असे उदात्त विचार मांडताना तिच्यावर नात्यांची बंधने तर नाही टाकत आम्ही? बाबानो ती फक्त माणूस आहे; Human being – Homo sapian – इतकाच विचार पुरेसा का नाही?
असो. प्रश्न अनेक आहेत, आम्ही फक्त साधेसुधे ५ मांडले, पुढचे प्रश्न पलंगाच्या बाजूने जाणारे विचारायची गरजही नाही. बघा! या प्रश्नांची उत्तरे तुमचे यजमान काय देणार ते! त्यांची विकेट उडली नाही तर जरूर सांगा!
आम्हाला पुन्हा पुन्हा बरं वाटतं आम्ही बाईच्या जातीला जन्माला आलो नाही याचे…. कारण असे प्रश्न ऐकल्यावर आम्ही आमच्या पत्नीला कधी आवाज चढवून, कधी प्रेमाने रूंजी घालून तर कधी न ऐकल्यासारख करून धुडकावून लावलं असतं.
देवा रे! पुढची हज्जार वर्षे तरी आम्हाला बायकांचा जन्म नको 😉 … आम्ही या पुरूषांच्या जन्मात अत्यंत सुखी आहोत.
आपला(उपरोधिक)
बेधडक.
वर्हाड निगालंय मुंबैला
“अवं भाऊ! काल तर आला की मंग आज का म्हून मुंबैला परत जातूय?” दाजींनी आश्चर्याने विचारले.
“दाजी, ह्यो पेपर बगा! येक लगीनाची पार्टी हाय, चौपाटीवर.”
“आता रं? कुनाचं लगीन काडलं? आनि तेंचा फोटु प्येपरात? बगू मला?” दाजींनी वर्तमानपत्र हिसकावून घेतले. “ह्ये काय? ही तर कुनी विदेशी बाय दिसते की रं? यांच्या लगीनघाईत तू काय करनार रे बाप्या?”
“दाजी, म्या कुटं जानार त्या मोट्या लोकांच्या समारंभात? ह्ये लगीन विदेशातच झालं बगा पर मुंबईत पार्टी हाय मग राजस्तानात पुना लगीन हाय म्हनतात. आता म्या चौपाटीवर चने-शेंगदाने विकतुया न्हाय का, चौपाटीवर लगीनाची पार्टी बगायला येनार्यांची ह्यी लाइन लागील बगा, त्येवडाच धंदा बरा व्हईल. निघतुच म्या!” भाऊ निघण्याची तयारी करायला लागला.
“आरं पन कोन लोक म्हनायचं ह्ये? वळखीचं नाय वाटंत.”
“ही बाय दिसते ना फोटुत, तिचं नाव हाय लिज़ हर्ली आनि तिला खेटून तो बाप्या हाय तेचं नांव अरुन नायर, बिज़नेसम्यान हाय म्हनतात पर कदीपन या बायच्या कमरेत हात टाकून फिरतानाच दिसतूया. कंचा बिजनेस हाय काय म्हाईत? पर बडे लोक हायेत, सारखे फोटुत दिसत्यात.”
“आरं पन बडे मंजे कोन? काय क्येलं त्येनी आपल्या हितं, भारतात? कुनाची मदत केली? कोनाला तरास दिला? कोनाला चार पैसं उचलून दिलं? म्या तर कदी शिनेमात बी न्हाय पायलं तेस्नी. राजकारनात सुदिक येकच विदेशी सून हाय. मग ही नवी सूनबाई कोन म्हनतुया मी?” दाजींना काही कळेनासे झाले होते. भाऊ मुंबईला गेलेला, ४ बुकं शिकलेला हुशार मनुष्य, त्याला जगाची माहिती होती, मुंबईचे मराठी आणि दोन चार इंग्रजी वाक्येही तो लिलया बोलू शकत होता.
“ही शिनेमातलीच हाये पर आपल्या किस्ना, रंग दे बसंती आन त्या भागमभाग मदली बाय नाय. ही विदेशी शिनेमातच काम करतीया, म्या पायला होता मागं, आयटम बाई हाय, आन तो बाप्याबी विदेशातच राहतुया.”
“प्वारगी बरी हाय रे दिसाया, जोडा कसा लक्श्मी नारायनागत दिसतुया.” बायजाक्कानेही डोळे भरून वर्तमानपत्रावरचा फोटो पाहून घेतला.
“कसचं आलया लक्श्मीनारायन आक्का? लेकुरवाळी हाय ती आनि वय हाय येक्केचाळिस आन तो बाप्याबी दुसर्या लग्नाचा हाये.” भाऊंनी मौलिक बातमी पुरवली.
“काय म्हनतूस? मंग ह्यो इतका गाजावाजा कशापायी? तिचंबी दुसरं लगीन आसल का रं?… तुला सांगतुया आमच्या बायजाक्काला येक्केचाळिसाव्या वर्सी जावय आला व्हता. या परदेसातल्या बायका बाकी जंक्शन, नायतर आमची बायजाक्का बगा, शेंगदान्याच पोतं बरं! आता सांग हिचं आपल्या पयल्या दादल्याशी काय बिनसलं?”
“अवं दाजी! हिला पयला नवराच न्हाय. मित्र व्हते दोन-चार. त्यातल्या येकाला तिनं सांगितलं की तूच माज्या प्वाराचा बाप! तो म्हनाला नाय मानत जा! बास! फाटलं की वं त्यांच. ”
“ह्ये घ्या! देसी नायतर विदेसी ह्ये विश्वामित्र समद्या जगात हाय म्हनायचं. बाप्यांची जातच मेली वंगाळ” दाजींच्या नसत्या टीप्पणीचा वचपा काढत बायजाक्काने तोंड उघडले.
“तू गप ग! दोन मान्स बोलत आसताना मदे मदे तोंड नगं खुपसू.” दाजीने बायजाक्काला दटावले.
“आरं भाऊ पर मला सांग हे दोगे लगीन करायला हितं का आले?”
“म्हायत नाय बा! त्या परमेस्वर आनि आदीने बोलावलं आसल.”
“ह्ये कोन परमेस्वरराव आनि आदीताई?” बायजाने पुन्हा तोंड घातले.
“आक्का! चुकलीस बग! परमेस्वर बाई हाय आनि आदी बाप्या. त्यानी चौपाटीवर मंडप टाकून लई जंक्शन तयारी केलीया लग्नाची.”
“आरं पर मला अजूनशान न्ह्याय कळलं की या दोगांनी येवडं मोटं काय केलंया की प्येपराच्या पयल्या पानावर तेंचे फोटु लावल्यात? आमचा बळीराजा आत्महत्या करतुयां, ती मुंबै-पुन्याची मानसं वीज टंचाईने कावली हायेत, ह्यी रोजची गुनेगारी वाढतीया, आनं ते समदं सोडून ह्ये दोगे का रं पयल्या पानावर?”
“आवं ह्यी मुंबै-पुन्याची मानसं अशा लोकास्नी ‘रोल म्वाडल’ म्हनतात. तेंच्यासारखं दिसायचं, वागायचं, बोलायचं मंजी रोल म्वाडल, मग त्यांचे फोटु नकोत का पयल्या पानावर?”
“आरं माज्या द्येवा! ह्यो बाप्या काडीमोड झालेला, ती बाय पोरास्नी घेऊन लगीन करतीया. चाळीशी उलटलेलं आनि तोकड्या कपड्यात झोंबाझोंबी करत फिरनारं ह्ये रोल म्वाडल? आनि मग ते आपलं मेधाताई, अन्ना, ते अभय बंग, बाबा आमटे ह्ये कोन म्हनायचं? राजा, पेकाट म्वाडलं रे माजं या बाता आयकून आनि येक सांग यांचं लगीन टिकलं का रं?”
“दाजी तुमी अडानी मानूस! किती कावताय, कशाला नसत्या पंचायती करताय? आवं आमच्या पुन्या-मुंबैची मानसं बी इतका इचार न्हाय करत. गुमान टिवी, प्येपरात या दोगांना बगतात आनि बातम्या चगळतात, तुमी या टिचभर गावात राहून कशापाय तरास करून घेताय? सोडा की वं राव, या मी तुमाला या दोगांच्या ड्रायवरची, घरगड्याची मुलाखत आलीया प्येपरात ती वाचून दावतो आनि मग मुंबैची एसटी पकडतो, कुनाला म्हाइत उद्या चौपाटीवर पार्टी व्हताना चने शेंगदाने विकनारा म्हनून ह्ये टिवीवालं माजीबी मुलाखत घीतील.”
****
क्योंकी सांस भी कभी….
वेळ — सकाळी ११ ची.
स्थळ — स्वयंपाकघर.
काळ — अगदी आताचाच, पुढच्या महिन्यातला नाही तर त्याच्या पुढच्या.
स्वयंपाकघरातून हिंग, कढीपत्ता, मोहरीची चरचरीत फोडणी दिल्याचा आवाज आणि घमघमाट सुटला होता. वास जयाकाकूंच्या नाकात भिनला होता. त्यांनी आपल्या नाकावर पदर दाबून धरला आणि तरातरा त्या स्वयंपाकघरात शिरल्या. ऐशू कपाळावरची बट हलकेच बाजूला सारून घर्मबिंदू आपल्या पदराने टिपत होती आणि गॅसवरच्या पातेल्यात डोकावत काहीतरी ढवळत होती आणि ‘दय्या दय्या दय्या रे!’ असं काहीसं गुणगुणत होती.
जयाकाकूंनी तिला तावातावाने विचारले,”तुमी कि कोरो, बहु?”
“येन अम्मा? ” ऐशू तालात म्हणाली, “अभीसाठी बिस्सिबेळेअन्ना आणि रस्सम बनवते आहे.”
“छी! छी! अम्मा बिम्मा म्हणू नकोस मला आणि अभी रस्सम, फस्सम नाही खात. त्याला छोलार दाल, माछ, भप्पा दोई सगळे बंगाली पदार्थ आवडतात हो.” जयाकाकू ठसक्यात म्हणाल्या.
“भप्पा म्हणजे ते तुमचे भप्पी लाहिरी त्यांचे चिरंजीव का?” ऐशूने आपले सामान्यज्ञान पाजळले.
भस्सकन कुकरची वाफ निघावी तशा जयाकाकू फुदफुदल्या,”भप्पा म्हणजे वाफवलेलं. स्टीम्ड! काय बाई तरी अक्कल आहे.”
“हे पाहा माझी अक्कल काढायचं कारण नाही. विश्वसुंदरीचा किताब आहे माझ्याकडे तो काही केवळ माझ्या तोंडाकडे आणि फिगरकडे पाहून नाही दिलाय,” ऐशूच्या नाका, तोंडा, कानातून वाफा यायच्या बाकी होत्या, “अभीपेक्षाही माझी अक्कल जास्त आहे हे सगळ्या जगाला माहित आहे.”
“हो तर! एकतर तू त्याच्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिले आहेस त्यामुळे तुझी अक्कल जास्त असायचीच आणि दुसरं म्हणजे अभीने तुझ्याशी लग्न करायचं ठरवलं तेव्हाच जगाला कळलं हो की त्याची अक्कल किती आहे ते,” जयाकाकूंनी कुजकट टोमणा मारला.
ऐशूच्या हिरव्यागार टपोर्या डोळ्यांत पाणी तरारले. आपला लोरिएलचा कलर फॅब्युलस मस्कारा त्या अश्रूंत विरघळणार नाही याची पुरेपुर काळजी घेऊन तिने आपले डोळे टिपले.
“एंक गोत्थु! तुमच्या मनात ती बंगाली राणी होती, मी अभीला गटवलं म्हणून तुमची धुसफुस सुरू असते.”
“हो तर! तुम्ही मद्रासिणी सगळ्याच तरबेज आहात पुरूषांना गटवण्यात. हेमा, श्रीदेवी, जयाप्रदा, तू”
“मस्त उपकारा!”, फणकार्याने ऐशू म्हणाली,”मी मद्रासी नाही पण तुम्हा उत्तर भारतीयांना ते सांगून फारसा उपयोग नाही म्हणा, आणि अम्मा! रेखाआंटीला विसरलांत का हो? ” आपल्या पापण्या फडफडवत ऐशूने लाडिक आवाजात विचारले.
जयाकाकूंना काय बोलावे सुचत नव्हते, संतापाने त्या धुसफुसत होत्या, “हे पहा आमच्या घरात राहायचं तर मिळून मिसळून राहावं लागेल.”
ऐशूने नाकाचा लाल झालेला शेंडा ओढला आणि सूंऽऽ असा दीर्घ श्वास घेऊन ती म्हणाली,”पुढल्यावेळी त्या ऑप्र्हा विन्फ्रीने मला बोलावलं ना तर तिला मी सरळ सांगणार आहे की आम्हा भारतीय बायकांना आपल्या आईवडिलांच्याच नाही तर सासू-सासर्यांच्या कह्यातही राहावे लागते. अजूनही या पारंतंत्र्यात खितपत पडलो आहोत आम्ही. एवढी हिर्यासारखी सून मिळाली तर त्याचे कौतुकही नाही तुम्हाला.”
“कौतुक आहे की पण हा हिरा है सभी के लिए त्याचं काय? तुझ्यासारख्या भारतीय बहुपेक्षा एखादी विदेशी बहु आणली असती तर परवडलं असतं पण विदेशी बहु म्हटलं की अमितच्या तळपायाची आग मस्तकाला जाते.” खट्टू होऊन जयाकाकू म्हणाल्या.
“जाणारच! त्यांनी तुम्हाला ‘लाभाचे पद’ म्हणून राज्यसभेचा राजीनामा द्यायला लावला, आणि मी; नाही तुम्हाला या स्वयंपाकघराचा राजीनामा द्यायला लावला तर पहा.”
आता डोळे टिपण्याची पाळी जयाकाकूंची होती. तेवढ्यात मागून तेजींचा आवाज आला,”घरोघरीच्या सविता आणि तुलसी तुमची जुगलबंदी संपली असेल तर ताटं वाढायला घ्या हो! अमित आणि अभी यायची वेळ झाली, या तुमच्या “बा”ने सर्वांसाठी पंजाबी खाना कधीच पकवला आहे.”
तिसरे पान
हे तिसरे पान म्हणजे एक अजब प्रकार असतो. यापानावर काय काय वाचायला मिळेल आणि काय काय बघायला मिळेल याची कल्पना साक्षात ब्रह्मदेवालादेखिल करता येणार नाही. या पानावर ज्यांची चित्रे झळकतात, बातम्या झळकतात ते मनुष्यप्राणी आपल्या पोटापाण्यासाठी नक्की काय करतात हे अद्याप आम्हाला समजलेले नाही.
कळले आहे ते इतकेच की सर्व समारंभांना, पार्ट्यांना या मंडळींची वर्णी अत्यावश्यक असते. केसांच्या आणि कपड्यांच्या झिंज्या, एकमेकांशी झोंबाझोंबी करताना काढलेली प्रकाशचित्रे आणि काहीतरी अर्तक्य सनसनाटी बातम्या यांनी हे पान भरलेले असते. गेल्या काही दिवसांतील लक्षात राहिलेल्या बातम्या पुढीलप्रमाणे —
- ब्रिटनी स्पिअर्सचे टक्कल
- संजूची मान्यता
- बिपाशा आणि जॉनचे नवे भांडण
- सलमानची जुनी गर्लफ्रेंड
- ऍना निकोल स्मिथच्या मुलीचा नवा बाप
- अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाचा मुहुर्त
- मॉडेल १ आणि मॉडेल ४ चे मॉडेल २ आणि मॉडेल ८ शी भांडण आणि समझौता.**
- एकता कपूर यांची क च्या बाराखडीतील नवी मालिका
- शाहरूख पुत्र करणला मावशी म्हणतो की रितुपर्णोला?
- शोभा डे मराठीत बोलल्या.
हाय रे आमच्या कर्मा!
** त्या मॉडेल्सची नावे कोणाच्या लक्षात राहत असतील तर कृपया कळवा.
आपला (त्रिदळ),
बेधडक