उबग

सितम्बर 24, 2007 at 8:36 पूर्वाह्न (टवाळकी, स्फुट)

’लोक तरी साले काय असतात एक एक?  एथिक्स नावाची गोष्टच शिल्लक उरलेली नाही.’ सायबाने आज जोड्याने हाणली होती ते त्याच्या डोक्यातून काही केल्या जात नव्हते. पुडीतले शेवटचे दोन चणे त्याने घशात ओतले आणि पुडी चुरगळून रस्त्यावर भिरकावून दिली.  घरापाशी आल्यावर त्याने आपले तोंड शर्टाच्या बाहीला पुसले. गल्लीच्या तोंडाशी कचर्‍याचा हा एवढा ढीग पडला होता. म्युनिसिपालटीची गाडी कचरा न्यायला आलीच नव्हती. लोकांनी घरात साचलेला कचरा आणून गल्लीच्या तोंडाशी टाकला होता.

’रस्त्यावर कचरा टाकतात. सुधारणार नाहीत लेकाचे.’  त्याने तोंड वेंगाडून नाक दाबले तरी नाक हुळहुळायचे थांबले नाही. “आक्छी! आक्छी!’ कचर्‍याच्या सुवासाने नाक साफ झाले. हाताला लागलेला शेंबूड कुठे पुसावा हे त्याला कळेना. इमारतीच्या भिंतीपेक्षा चांगली जागा त्याला दिसली नाही तशी त्याने हात भिंतीला पुसून घेतले.

घराच्या पायर्‍या चढता चढता त्याला सकाळच्या भांडणाची आठवण झाली. ’बायकोला कैदाशीण म्हणालो होतो नाही?’ आता कोणत्या पिंजर्‍यात रवानगी करते कोणास ठाऊक? कपाळावरचा घाम पुसत त्याने बेल दाबली. दरवाजा उघडला तसे त्याने थेट बाथरूम गाठले आणि पाण्याचे दोन तांबे डोक्यावर रीते केले.  ’काहीतरी कारण काढून या ब्यादेचे तोंड बंद ठेवायला हवे. कटकट साली. बोलायला लागली की नको जीव करते.’  डोकं खसाखसा पुसत बाहेर येत त्याने खुंटीवरचे जानवे काढले आणि गळ्यात घातले.
’च्यामारी! डाव्या खांद्यावरून घालायचे की उजव्या?’ मनात विचार करत त्याने गजानन महाराजांची पोथी काढली आणि मनोभावे वाचायला सुरुवात केली.

’आज काय नवं नाटक? देवभक्तीचं?’ कानावर टोमणा आला तसे त्याने दुर्लक्ष केले आणि वाचन सुरु ठेवले. एव्हाना बायकोच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला होता. ’जळ्ळा मेला जन्म बायकांचा! या पुरुषांनी उठावं आणि काहीही बोलावं….’ त्याने वाचताना एक उसासा सोडला.

’ट्रींग…’ दाराची घंटा वाजली तशी त्याच्या मनाला उभारी आली. कोणीतरी घरी आलं होतं, चला त्यानिमित्ताने हिचं तोंड गप राहील. तो धडपडत उठला आणि दार उघडायला गेला.

’कोण होतं?’ त्याला दरवाजा बंद करताना पाहून बायकोने विचारलं.
’पोष्टमन!’ त्याने हिरमुसले होऊन उत्तर दिलं.
’पोष्टमन या वेळेला?’
’ओवरटाईम करतात म्हणाला. जाऊ दे! कोणतीतरी बिलं आली होती माझ्या नावावर ती द्यायला आला होता. जेवायला बसूया का?’ त्याने नरमाईने विचारलं.
’अडलंय माझं खेटर! सकाळचं भांडण विसरलात का? राहा आज उपाशी.’ ती नेहमीप्रमाणे तावातावात.
’आं? खेचर… हा खेचर कसा उपटला?’ त्याने कपाळाचा घाम पुन्हा एकदा पुसला.
’कान घ्या तपासून… नाहीतर असं करा डोकंच घ्या तपासून.’ ती फुरंगटली की जरा जास्तच जाडी दिसायची.

काही न बोलता तो गुमान गादीवर पडला आणि डोक्यावर चादर ओढून चुपचाप पडून राहिला. डोकं भणाणत होतं, पोटात कावळे कोकलत होते, हात आणि तोंड शिवशिवत होतं पण त्याला या सर्वाचा “उबग” आला होता. ’आज काही न बोलता झोपूया सालं! आजचा दिवसच वाईट गेला. उबग आलाय सर्वाचा… उद्या नवा दिवस सुरु झाला की बघून घेईन एकेकाला.’ … आणि तो डोळे मिटून घोरण्याचं नाटक करू लागला.

4 टिप्पणियां

  1. yogesh said,

    hmm

  2. yogesh said,

    samajala ata.

  3. harekrishnaji said,

    Nice to read after a long gap

  4. Quality Tale said,

    मराठी साहित्याच्या या उपक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा!
    ही दिवाळी आपणास व आपल्या कुटुंबियांना सुख समाधानाची आणि भरभराटिची जावो!

    दिवाळी निमित्य हार्दिक-हार्दिक शुभेच्छा!

    आपला,

    अनिरुद्ध देवधर

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s

%d bloggers like this: