गोष्ट एका माठ्याची!!

जून 19, 2007 at 11:46 पूर्वाह्न (स्फुट)

या गोष्टीतील व्यक्तींत आणि स्थळांत  कोणालाही जिवंत किंवा मृत  व्यक्तींत किंवा परिचित स्थळांत साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.

एक आटपाटनगर होतं. त्या नगरात सर्वत्र सुबत्ता, आनंद नांदत होता. रामराज्यच जणू. सगळे प्रजाजन आनंदी होते. ते राजाला, एकमेकांना दुवे देत, मदत करत, गुजगोष्टी करत, जणू एक अखंड कुटुंब. राजाला आपल्या प्रजाजनांवर कोण विश्वास. त्याच्या गैरहजेरीतही राज्याचे सर्व कारभार सुरळीत चालत होते. राजा महालाबाहेर पडेनासा झाला. कालांतराने आपला राजा कसा दिसतो हे लोक विसरायला लागले.

अशातच, एक दिवस त्या नगरात माठ्या नावाच्या एका विदूषकाचे आगमन झाले. नगरातील मोक्याच्या ठिकाणी माठ्याने आपले कार्यक्रम ठेवले. विदूषकाला रूप बदलण्याची कलाही अवगत होती. केंव्हाकाळी तो ‘भावना प्रधान’ या स्त्रीचे रूप घेई, केंव्हा केंव्हा “भों भों भुंकणार्‍या कुत्र्याचे” तर केंव्हा बोबडे बोलणार्‍या लहान बाळाचे.  लोकांना माठ्याची सगळी रुपे आवडली. मुक्तकंठाने त्यांनी त्याचे कौतुक सुरू केले. माठ्याही सुखावला, आनंदला. आता नगरांत काही लोक डांबीस असायचेच. त्यांनी माठ्याला हरभर्‍याच्या झाडावर चढवले. काही लोकांनी तर माठ्याला ‘तूच आमचा राजा! तुझ्यामुळेच आमच्या नगरात सगळ्यांच्या चेह्र्‍यावर हसू उमटते, नगरात सुबत्ता नांदते’ असे सांगायला सुरुवात केली. माठ्या काही मूर्ख नव्हता पण त्याला हळूहळू लोकांचे म्हणणे पटू लागले. काही शहाणे लोक मात्र जगाची रीत असल्यागत मूग गिळून गप्प बसले.

आता माठ्या आपल्याला नगराचा स्वामी समजू लागला. लोक माठ्याला मुजरा करत, त्याला साष्टांग दंडवत ठोकत. माठ्याही आपल्या लंब्याचौड्या गप्पांनी लोकांना भुलवत असे. नगरात नव्याने येणारे लोक माठ्यालाच राजा समजू लागले. असे करता करता, माठ्याच्या गर्वाच्या झोपडीचे महालात रुपांतर झाले. माठ्या स्वत:ला नगराचा शासक समजू लागला.

मग एके दिवशी गावात सुंद आणि उपसुंद या बंधूद्वयीचे आगमन झाले. नगरात लोक माठ्याला राजा समजतात हे त्यांना सहन होईना. त्यांनी ‘कला’गती लावायला सुरुवात केली. लोकांना आपल्या नगरावर, शांततेवर, सुबत्तेवर आक्रमण झाल्यासारखे वाटू लागले. माठ्याला पुढे करून आपापल्यापरीने त्यांनी हे आक्रमण थोपवून धरण्याचा प्रयत्न केला. माठ्यानेही आपली गादी जाते आहे अशा आवेशात मुकाबला केला पण सुंद-उपसुंदही अनेक कलांगतीत पारंगत असल्याने माठ्याची डाळ शिजेना. कालांतराने नगरातील लोकांत फाटाफूट होऊ लागली. माठ्याचा पक्ष, सुंदाचा पक्ष, उपसुंदाचा पक्ष असे अनेक पक्ष होऊन नागरिक एकमेकांविरुद्ध उभे ठाकले. काही शहाणे लोक मात्र जगाची रीत असल्यागत मूग गिळून गप्प बसले.

सुंदाला नगराचे स्वामित्व हवे होतेच, इतर दोघांपेक्षा तो थोडा जास्त हुशार होता, त्याच्या शब्दांना एकप्रकारचा लेहजा होता. ,  यावर  त्याने एक तोडगा काढला आणि  प्रीतीभोजन आयोजित केले. त्या समारंभाचा प्रमुख पाहुणा म्हणून माठ्याला आमंत्रित केले. माठ्या मुलखाचा विदूषकच, तो उड्या मारत समारंभाला गेला. सुंदाच्या बगलेत बसून जेवणखाण केले, पेयपान केले आणि तारेत मित्रत्वाच्या शपथा घेतल्या. दोन्ही पक्षांतील लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या घटनेचे स्वागत केले. काही शहाणे लोक मात्र जगाची रीत असल्यागत मूग गिळून गप्प बसले.

येथे उपसुंदाचे काहीतरी अजबच चालले होते. त्याने राजालाच गाठले, ‘तुमचा कारभार बरोबर नाही, पद खाली करा’ अशी राजावर नोटिश ठोकली. राज्य चालवता येत नसेल तर मला विकून टाका अशी घोषणा केली. त्याबरोबर नगरवासी हवालदिल झाले. उपसुंदाला ठोकून काढण्याचे सर्व उपाय योजायला लागले. त्या काळात अचानक माठ्याने पलटी खाल्ली. विदूषकच तो, कोलांट्या उड्या मारण्यात त्याचे हातपाय कोण धरणार? उपसुंद आणि माठ्याचे दोस्ती प्रकरण शोलेमधल्या जय आणि विरूपेक्षाही गाजायला लागले. काही शहाणे लोक मात्र जगाची रीत असल्यागत नेहमीप्रमाणेच मूग गिळून गप्प बसले.

आता राजाला जाग आली. आपले राज्य कोणीतरी भलतेच चालवते आहे याची त्याला प्रचीती येऊ लागली. राजाच्या दरवाजावर असणारी भलीजंगी घंटा त्रस्त नागरिकांनी बडवायला सुरुवात केली होतीच. राजाने मग, नागरिकांवर अनेक निर्बंध लादले, माठ्या, सुंद-उपसुंद यांची गळचेपी केली. ओल्याबरोबर सुके जळते या न्यायाने राजाने सर्वच नागरिकांची पिळवणूक करायला सुरुवात केली. काही शहाणे लोक मात्र जगाची रीत असल्यागत नेहमीप्रमाणेच मूग गिळून गप्प बसले.

माठ्या राजाला शिव्याशाप द्यायला लागला. त्याला काबुली चण्याच्या झाडावर चढवायला सुंद-उपसुंद तयार होतेच, पण झाल्या प्रकारातून सुंद-उपसुंद जे शिकले ते माठ्या निम्म्यानेही शिकला नाही. माठ्याच्या तळपायाची आग, हृदयातली तगमग आणि डोक्यातली राख इतकी वाढली की माठ्याने आटपाटनगराला राम राम ठोकला आणि घर देता का घर अशी आरोळी ठोकत तो इतर राज्यांच्या आश्रयाला गेला. काही शहाणे लोक मात्र जगाची रीत असल्यागत नेहमीप्रमाणेच मूग गिळून गप्प बसले.

माठ्याची ख्याती इतर राज्यांतही पोहोचली होतीच त्यामुळे ते राज्यकर्ते माठ्यापासून बिचकून राहायला लागले. माठ्या नाराज झाला, जिवाची तगमग थांबेना. तेलही गेले तूपही गेले अशी परिस्थिती होऊन गेली. आप्तस्वकीय सोडून गेले. भळभळा वाहणारी जखम उराशी घेऊन माठ्या आता घर शोधत फिरतो…… घर देता का घर असे उदास प्रश्न विचारतो…. आणि काही शहाणे लोक मात्र जगाची रीत असल्यागत नेहमीप्रमाणेच मूग गिळून गप्प बसलेले दिसतात.

8 टिप्पणियां

  1. Archana said,

    काही शहाणे लोक मात्र जगाची रीत असल्यागत नेहमीप्रमाणेच मूग गिळून गप्प बसलेले दिसतात.

    :d upasund, mathya, raja kon te kalale. ha sund kon buva? 😀 dhamaal lekh.

  2. anu said,

    Lekh manala bhidala.
    Apan nakki konatya rakyatale kon yacha jordar tapas itarankadun chalu ahe..Aso. Amhi tya tapasat nahi.

  3. Yogesh said,

    😀 .

  4. Yogesh said,

    tumhi amachya rajyache rahivashi ahat yat shankach nahi.

    pan kon te kalat nahi.

  5. bedhadak said,

    प्रतिसादांसाठी धन्यवाद मंडळी!
    अनुताई आणि योगेश,
    आम्ही तुमच्यातलेच आहोत हे वेगळे सांगणे न लगे. खरे नाव सांगायला हरकतही नाही परंतु बुरख्यात राहून बेधडक लिहिता येते ते बुरख्याशिवाय लिहिता येणार नाही किंवा अद्याप आमच्या मनाची तशी तयारी नाही. 🙂 माणसांची केवळ टिंगल उडवण्यासाठी हे लेखन नव्हते म्हणून टवाळकी न म्हणता स्फुट म्हटले, अनुताई ते तुमच्या मनाला भिडले हे वाचून बरे वाटले.
    तूर्तास एवढेच सांगतो की आम्ही त्या मूग गिळून गप्प बसणार्‍या शहाण्या माणसांतील नाही हो!

  6. techmilind said,

    दे धडक ! बेधडक !!
    जियो !!!!!

    (आणि हो, सुंद कोण तेही कळले 🙂

    – उपसुंद

  7. Kedar said,

    Jabara!!
    hya mathya che he hubehub varnan aahe!!
    mathya chyach bhashet ‘mathya kya cheej hai sabako pata hai!’ 😉

    (mug gilun gappa) kedar

  8. yogesh said,

    gayab jhalat kay?

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s

%d bloggers like this: