आमचं खरमरीत उत्तर

मार्च 14, 2007 at 12:49 अपराह्न (टवाळकी)

आमचा विश्वचषकी त्रागा – १ 

“अहो काय हे?  काय करताय काय?” आमच्या हिने वैतागून विचारले.

“आम्ही रागावलोय.” आमचे प्रामाणिक उत्तर.

“हो क्का? मग बेधडकराव कोणाला धडक देण्याच्या विचारात आहेत?”

“भारतीय क्रिकेट संघातील या प्रभृतींना. त्यांना आम्ही खरमरीत आमच्या धाटणीचे उत्तर पाठवणार आहोत.”

“हम्म! म्हणूनच कागदांचे बोळे टाकले आहेत वाटतं, मी आहे ना हक्काची मोलकरीण” ही वैतागली की मनापासून बरं वाटतं बघा!, “निदान काय खरडलंय ते तरी दाखवा.”

“हे घे वाच, नंतर टाकतो पोस्टात.”

राहुल द्रविड:

वर्ल्डकप जिंकणं ही सर्वाधिक आनंदाची गोष्ट झाली. तसं झालं नाही तरी आयुष्य काही थांबणार नाही. यू हॅव टु मूव्ह ऑन. सर्वोत्कृष्ट खेळ दाखवणे तुमच्या हातात आहे.

प्रति द्रविड:

बरोबर बोललात कॅप्टनसाहेब. यावरून आपली तयारी किती आहे ते कळलं हो आम्हाला. आम्ही आत्तापासूनच मूव्ह ऑन व्हायला लागलो आहोत आणि तुम्हाला काय हो, आयुष्य थांबत नाही, जाहिराती मिळायच्या थांबत नाहीत, समालोचन करण्याची संधी थांबणार नाही काहीच नसेल तर व्हा टिव्ही होस्ट आणि हसा खदाखदा! आम्ही आहोत ना दिवसभर खोळंबून तुमचा खेळ पाहायला.

सचिन:

आयुष्यात एकदातरी वर्ल्डकप खेळावा अशी माझी इच्छा होती. माझा पाचवा वर्ल्डकप असल्याचं माझं मलाच खरं वाटत नाहीये, बट वी वुड गिव्ह इंडिया अ रिझन टु स्माईल.

प्रति सचिन:

सच्चू कशाला फेकतोस लेका, आम्हाला मात्र हल्ली हा तुझा पाचवा वर्ल्डकप आहे हे पटू लागले आहे.  तू इथून निवृत्त झालास की राजकारणात जाशील बघ! मागच्या वेळेला कोण बरे ते इंडियाला शायनिंग होण्याचे रिझन देत होते तू आम्हाला स्मायलिंग रिझन देऊन त्यांची रीऽऽऽ खेच म्हणजे झालं.

रिकी पॉंटींग

थोडी गडबड झालीये हे मान्य, पण म्हणून कोणी आम्हाला गृहित धरणार असेल तर मग मी एवढंच म्हणेन बीट अस इफ यू कॅन!

प्रति रिकी

अरे तू इतरांचं बोलणं थोडं तरी मान्य केलस आम्ही धन्य झालो. असो, क्रिकेट, बेसबॉल, टेनिस, बॅडमिंटन सर्व प्रकारच्या बॅटी आणल्यात तुला बीट करायला. बोल कधी भेटतोस, हात जाम शिवशिवत आहेत.

सुनिल गावस्कर

इतकी पॅशन फक्त आपल्या देशातच पाहायला मिळते. राहुल ऍन्ड बॉइज ब्रिंग बॅक द कप व्हेअर इट बिलॉंग्ज.

प्रति गावस्कर

सकाळी सकाळी घेतली मध्ये आहात का हो? पॅशन नाही फॅशन म्हणायचे वाटते तुम्हाला? जरा  ढोणी, इरफानकडे बघा आणि कपाची जहागिरदारी भारताला कधी मिळाली?  उगीच टुरटुर!

अनिल कुंबळे

वर्ल्डकप नंतर मी एकदिवसीय सामने खेळणार नाही. वाढत्या वयाची गोष्ट तुम्ही अमान्य करू शकत नाही. जॉन्टी र्‍होड्सप्रमाणे मी क्षेत्ररक्षण करावं अशी तर तुमची अपेक्षा नाही नं!

प्रति कुंबळे

हो रे राजा चुकतंच बघ आमचं. आम्हीच या ३५-३६-३७ वर्षांच्या फळीकडून उत्तम आणि अनुभवी क्रिकेट मिळण्याची अपेक्षा करतो, पण वर्ल्डकपनंतर तुला बोलावतंय कोण एकदिवसीय सामने खेळायला?

कपिलदेव

निवड समितीने उत्कृष्ट संघ निवडलाय पण एकदिवसीय सामन्यात विजय पराजय त्या त्या दिवसातल्या बर्‍याच गोष्टींवर अवलंबून असतो. ठरवून काही करता येत नाही.

प्रति कपिल

बरोबर बोललास रे देवा! आम्ही ठरवलंय की एप्रिलच्या २८ तारखेपर्यंत सगळी देवळे पालथी घालायची. खंडोबा, वेतोबा, जगदंबा सर्वांना जोडीने येतो असा नवस बोललोय. दर मंगळवारी गणोबा दर्शनालाही जायचं म्हणतोय तेव्हा चांगल्या खेळाची गरज नाही… देव तारी त्याला कोण मारी नाही का?

****

“अरेच्चा! खरंच रागावलेले दिसताय तुम्ही. म्हणजे अगदी वैतागून दिलेली उत्तरे दिसली, पण ती भारतीय संघापर्यंत पोहोचायची कशी?”  किती प्रश्न पडतात हिला.

“सोपंय! आम्ही याची एक कॉपी आमच्या लाडक्या मंदिराला पाठवतोय आणि वाच गं बाई जरा आमच्यासाठी अशी गळ घालतोय.”

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s

%d bloggers like this: