जागतिक महिला दिन

मार्च 8, 2007 at 1:57 अपराह्न (टवाळकी, स्फुट)

जागतिक महिला दिन आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करतो, अगदी झोकात! कारण अचानक आम्हाला ८ मार्चला आपण बाई नसल्याचा जाज्वल्य अभिमान दाटून येतो. 

या दिवशी स्त्रियांची आर्थिक, सामाजिक आणि राजकिय क्षेत्रातील कामगिरी जगासमोर मांडली जाते, त्यांची वाहवा होते, सत्कार होतो.  स्वत: स्त्रिया हिरिरिने पुढे येऊन आपली कामगिरी जगाला सांगतात. स्त्रियांनी कसे मोठे व्हावे, आपली उन्नती कशी करावी याचे दाखले देतात.

हे सर्व पाहिले की आम्हाला गावाकडे बैलांचा सण असतो, पोळा; त्याची आठवण होते. (वाईट डोकं आहे आमचं!)  यादिवशी बैलाला सजवले जाते, झूल घातली जाते, त्याची पूजा केली जाते, त्याला नैवेद्य दाखवला जातो आणि दुसर्‍या दिवशीपासून पुन्हा आसूडांनी पाठ रंगवली जाते. नाही, स्त्रियांची परिस्थिती तितकी भीषण नाही, निदान शिकल्या सवरलेल्या स्त्रियांची तरी नाही हे सांगायला स्त्रियाच पु्ढे येतील पाहा. त्या सर्व स्त्रियांना आमचे काही प्रश्न आहेत —

१. मला H1 मिळतोय. तू तुझी नोकरी सोडून माझ्याबरोबर चलतोस का रे अमेरिकेला H4 वर? असे कधी विचारले का हो तुम्ही तुमच्या यजमानांना?

२. मला प्रमोशन मिळतंय. पगार सॉलिड वाढणार आहे. तुझ्या नोकरीची आता गरज नाही रे. घरात मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे, तू नोकरी सोडतोस का रे? किंवा  मला फिरतीची नोकरी मिळते आहे, मी फक्त शनिवार-रविवार घरी येऊ शकेन. तू घर-मुलं सर्वांची काळजी घेशील ना रे?

३. ए आज ना मला पिठलं भाकरी खायचा जाम मूड आहे, थापतोस का रे दोन भाकर्‍या माझ्यासाठी?

४. मला नोकरी आणि राहतं घर सोडून समाजकार्य करायचे आहे, त्यासाठी मी आदिवासींच्या पाड्यात जाऊन राहणार आहे. नवरा म्हणून माझ्या खांद्याला खांदा लावून तू उभा राहशील ना रे? (उंबरठा चित्रपटातील स्मिता पाटीलांची आठवण झाली.)

५. माझे आई-बाबा म्हातारे झाले आहेत, त्यांच्याकडे पाहायला कोणी नाही. आपण आता त्यांच्याबरोबर त्यांच्याकडे राहू. तुला घरजावई म्हणून घेण्यात कमीपणा नाही ना वाटणार?

अपवादात्मक असे नवरे मिळणे अशक्य नसावे पण किती असतील, हाताच्या बोटांवर मोजण्या इतके? आम्हाला शंका वाटते. स्त्री ही आमची आई, बहिण, मुलगी, मैत्रिण असे उदात्त विचार मांडताना तिच्यावर नात्यांची बंधने तर नाही टाकत आम्ही?  बाबानो ती फक्त माणूस आहे; Human being – Homo sapian – इतकाच विचार पुरेसा का नाही?

असो. प्रश्न अनेक आहेत, आम्ही फक्त साधेसुधे ५ मांडले, पुढचे प्रश्न पलंगाच्या बाजूने जाणारे विचारायची गरजही नाही. बघा! या प्रश्नांची उत्तरे तुमचे यजमान काय देणार ते! त्यांची विकेट उडली नाही तर जरूर सांगा!

आम्हाला पुन्हा पुन्हा बरं वाटतं आम्ही बाईच्या जातीला जन्माला आलो नाही याचे…. कारण असे प्रश्न ऐकल्यावर आम्ही आमच्या पत्नीला कधी आवाज चढवून, कधी प्रेमाने रूंजी घालून तर कधी न ऐकल्यासारख करून धुडकावून लावलं असतं.

देवा रे! पुढची हज्जार वर्षे तरी आम्हाला बायकांचा जन्म नको 😉 … आम्ही या पुरूषांच्या जन्मात अत्यंत सुखी आहोत.

आपला(उपरोधिक)
बेधडक.

10 टिप्पणियां

 1. आनंद घारे said,

  पोळ्याच्या दिवशी बैलाचा मालक जे काही करतो त्यामुळे तो बैल खुष होतो किंवा नाही ते मला माहीत नाही, बहुधा मालकच त्या निमित्ताने गोडधोड खाऊन घेतो. कुठल्याही बैलाने आपण होऊन हंबरडा फोडून आनंद व्यक्त करून पोळा साजरा केल्याचे ऐकिवात नाही. पण महिला दिनाच्या दिवशी यशस्वी स्त्रियांनी बरेच कांही चांगले सांगितलेले दूरचित्रवाणीवर पहायला मिळाले. याअर्थी दोन्हीमध्ये गुणात्मक फरक आहे असे दिसते.
  नव-यावर कुरघोडी करणे आणि महिला दिन साजरा करणे यातला संबंध कळला नाही. संसार किंवा कुटुंबव्यवस्था टिकवून धरण्याला स्त्रियांनी जास्त महत्व दिले तर त्यात काय बिघडले? वर दिलेल्या पांचही प्रश्नांची होकारार्थी उत्तर दिलेले पुरुष या जगात सुखाने रहात आहेत, तसेच ही तयारी न दाखवणा-या बायकासुद्धा आहेत. हा ज्याच्या त्याच्या परिस्थितीचा प्रश्न आहे. असे मला वाटते.

 2. bedhadak said,

  अहो आनंदराव,

  काय मनावर घेताय आमचं उपरोधिक बोलणं? पोळ्याला बैल खूष नाही होत हे नाही हे तरी कोणी छातीठोकपणे सांगेल का? त्याला एक दिवस काम करावं लागत नाही, आराम मिळतो, बात खुषीची नाही का? आम्ही सांगतोच आहोत की स्त्रियांची परिस्थिती आता तेव्हढी भीषण नाही, सुधारली आहे.

  खरं म्हणजे आम्हाला अशा प्रतिसादाची अपेक्षा होतीच आणि पुरूषांकडूनच होती. आपल्यासारख्या व्यक्तीकडून येईल ही मात्र नव्हती.

  येथील ५ प्रश्नांत आपल्याला कुरघोडी कोठे दिसली ते खरेच कळले नाही, रोजच्या व्यवहारातील प्रश्न आहेत. कुरघोडी असेल तर मात्र सगळे नवरे बायकांवर सतत कुरघोडी करत असतात असे म्हणावे लागेल. संसार किंवा कुटुंबव्यवस्था ही दोघांनीही टिकवून धरायची असते, बायकांवर का हो जास्त बोजा? ही व्यवस्था टिकवण्याला स्त्रिया महत्त्व देतात की त्यांनी महत्त्व द्यावे असे आम्ही त्यांच्यावर लहानपणापासून बिंबवत असतो? का बायकांनी समाजकार्यासाठी घर सोडले तर कुटुंबाचा त्याग करावा लागतो? उदा. मेधा पाटकर किंवा उंबरठा चित्रपटातील नायिका. तसाच त्याग बाबा आमटे, बंग यांना करावा लागल्याचे ऐकिवात नाही. तरी आता स्त्रिया आता असे स्वतंत्र निर्णय घ्यायला लागल्या आहेत असे दिसते. मागे एक ब्लॉग वाचला होता (बहुधा ट्युलिपचा) त्यात अश्या विषयावर लेख होता.

  प्रत्येक घराघरांतून नवरे आपल्या बायकांना असे प्रश्न विचारताना दिसतील, पण अपवाद सोडता घराघरातून बाया नाही दिसणार असे विचारताना. आपल्या आईवडिलांबरोबर बायकोने प्रेमाने राहावे ही अपेक्षा करताना दिसतील. (घरसून हा शब्द ऐकला का कधी, घरजावई मात्र अजूनही रूढ आहे.)

  आम्हाला एका प्रश्नाचे बेधडक उत्तर द्याल का? आपल्या कुटुंबात अशी उदाहरणे किती? असलेच तर एखादेच असेल ना आणि त्यात राजीखुशी किती असेल याबाबत आम्ही साशंकच आहोत.

  वरील पाचही प्रश्नांची होकारार्थी उत्तरे “अपवादाने” असतील हे आम्ही म्हटलेच आहे… आपण आपले किंवा आपल्या जवळच्या कुटुंबातील किती उदाहरणे येथे द्याल? अश्याप्रकारांचे प्रमाण किती आणि कसे व्यस्त आहे ते सांगणे शक्य आहे का?

  – बेधडक

 3. कसं काय said,

  बेधडक
  तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आता तुम्ही सगळे प्रश्नं भारतिय स्त्रियांच्या संदर्भात विचारले आहेत. पण महिला दिन हा जागतिक पातळीवर साजरा का केला जात असेल बरं? तर स्त्रियांचे प्रश्न अख्ख्या जगात कमी अधिक प्रमाणात आहेत म्हणून. तुमच्या लिखाणाला जरा आंतरराष्ट्रीय पैलू का काय म्हणतात ते जोडण्याचा प्रयत्नं करते आहे. अमेरिकेत स्त्रियांची परिस्थिती बरीच बरी असली – तरी पुरूष प्रधानता बहुतेक ठिकाणी आढळते. अजून एकही स्त्री राष्ट्राध्यक्षं नं लाभलेल्या या देशात आताशा स्त्री राष्ट्राध्यक्षांसाठी आपण तयार आहोत का (म्हणजे काय?) वगैरे वगैरे चर्चा सद्ध्या सुरू आहे.
  आता तुमच्या प्रश्नांना माझ्या अमेरिकन नवर्‍याची उत्तरे कशी असतील ते पहा:

  १. “नोकरी सोडशील का?” या प्रश्नाचे उत्तर हो, पण अमेरिका सोडशील का या प्रश्नाचे उत्तर “नाही”
  २.उत्तर हो – एका पायावर तयार.
  ३. उत्तर हो – (पिठलं भाकरीच्या ऐवजी पिझ्झा म्हणावं लागेल, पण जरूर करून घालेल, नव्हे- घालतोच. )
  ४.उत्तर “नाही” असे मिळेल.
  ५.उत्तर “नाही” असे आहे पण त्याचा स्त्री पुरूष या विषयाशी काही संबंध नाही.
  म्हणजे पाच पैकी अडीच गुण.
  तेच प्रश्न त्यानी मला विचारले तर पाचही प्रश्नांना होकार मिळेल.
  Human being – Homo sapian हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. स्त्री आहे म्हणून सहानुभूतीची अपेक्षाही करू नये आणि कमीपणाही घेऊ नये.

 4. TheKing said,

  A good 1!

  Nice to find this blog. Sampoorna vachoon kadhayla hava 🙂

 5. प्रभावित said,

  यात मी काही पराक्रम केला किंवा करते आहे असे नाही, पण वरच्या ५ प्रश्नांपैकी ४ प्रश्नांची उत्तरे माझ्या आणि माझ्या नव‍र्‍याच्या बाबतीत होकारार्थी आहेत. या गोष्टीत आम्ही जगावेगळे काही करत आहोत असा दोघांचाही दावा नाही. तो सध्या आमच्या २ महीन्याच्या बाळाचीही काळजी घेत आहे. तो कमावत असता तर मीही आनंदाने हे सगळे केले असते. महिला दिन एक दिवस साजरा करुन काय करायचे. द्रुष्टीकोन बदलायला हवा. कुरघोडी करण्यात काय सुख? समानता हवी.

 6. anu said,

  बेधडकराव,
  आपल्या उपरोधातल्या भावना मनाला भिडल्या.

 7. प्रियंभाषिणी said,

  अरे वा! ती फक्त माणूस आहे.. त्याकडे आधी पाहा आणि नंतर नात्यांची बंधने घाला अगदी माझ्या मनातील वाक्य.

  हे एखाद्या भारतीय पुरूषासाठीच प्रश्न असावेत. अमेरिकेत अर्थातच त्यांच्याकडून बरीच होकारार्थी उत्तरे येतील तरी प्रमाण कमीच असेल.

  आपली अनुदिनी फारच मजेशीर आहे. विशेषत: हर्ली-नायर विवाहाचा लेख वाचून मजा वाटली.

 8. आनंद घारे said,

  श्री बेधडकराव,
  माझ्या प्रतिसादाला इतके महत्व देऊन त्यावर सविस्तर उत्तर दिलेत याबद्दल आभारी आहे. मुळात मी हा प्रतिसाद कां दिला यावर मी आता माझ्याच ब्लॉगच्या पुढील पानावर विस्ताराने लिहीन. ते वाचावे अशी आताच विनंती करतो. “माझ्यासारख्या व्यक्तीकडून” कुणाची कांही अपेक्षा असेल किंवा नसेत हा विचारच कधी मनात आला नव्हता. त्यामुळे त्याबद्दल कांही खुलासा झाल्यास त्यातून कदाचित एखादी नवी वाट दिसेल.

  गेल्या वेळेस एक गोष्ट लिहायची अनवधानाने राहून गेली होती. तुम्ही छान लिहिता.

 9. bedhadak said,

  सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकर्त्यांचे आभार.

  कसं काय तुमचं म्हण्णं बरोबर आहे पण आम्ही पडलो भारतीय म्हणून भारतीय नवर्‍यांबद्दल लिहिले. आपण अमेरिकी मानसिकता सांगितल्याबद्दल धन्यवाद.

  प्रभावित तुमच्यासारखी कुटुंबे अधिकाधिक निपजोत.

  घारेसाहेब सोडा की हो राव, रात गयी बात गयी.

 10. Archana said,

  बाबानो ती फक्त माणूस आहे; Human being – Homo sapian – इतकाच विचार पुरेसा का नाही?

  laakhamolachi baat!

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s

%d bloggers like this: