वर्‍हाड निगालंय मुंबैला

मार्च 7, 2007 at 2:05 अपराह्न (टवाळकी, स्फुट)

“अवं भाऊ! काल तर आला की मंग आज का म्हून मुंबैला परत जातूय?” दाजींनी आश्चर्याने विचारले.

“दाजी, ह्यो पेपर बगा! येक लगीनाची पार्टी हाय, चौपाटीवर.”

“आता रं? कुनाचं लगीन काडलं? आनि तेंचा फोटु प्येपरात? बगू मला?” दाजींनी वर्तमानपत्र हिसकावून घेतले. “ह्ये काय? ही तर कुनी विदेशी बाय दिसते की रं? यांच्या लगीनघाईत तू काय करनार रे बाप्या?”

“दाजी, म्या कुटं जानार त्या मोट्या लोकांच्या समारंभात? ह्ये लगीन विदेशातच झालं बगा पर मुंबईत पार्टी हाय मग राजस्तानात पुना लगीन हाय म्हनतात. आता म्या चौपाटीवर चने-शेंगदाने विकतुया न्हाय का,  चौपाटीवर लगीनाची पार्टी बगायला येनार्‍यांची ह्यी लाइन लागील बगा, त्येवडाच धंदा बरा व्हईल. निघतुच म्या!” भाऊ निघण्याची तयारी करायला लागला.

“आरं पन कोन लोक म्हनायचं ह्ये? वळखीचं नाय वाटंत.”

“ही बाय दिसते ना फोटुत,  तिचं नाव हाय लिज़ हर्ली आनि तिला खेटून तो बाप्या हाय तेचं नांव अरुन नायर, बिज़नेसम्यान हाय म्हनतात पर कदीपन या बायच्या कमरेत हात टाकून फिरतानाच दिसतूया. कंचा बिजनेस हाय काय म्हाईत? पर बडे लोक हायेत, सारखे फोटुत दिसत्यात.”

“आरं पन बडे मंजे कोन? काय क्येलं त्येनी आपल्या हितं, भारतात? कुनाची मदत केली? कोनाला तरास दिला? कोनाला चार पैसं उचलून दिलं? म्या तर कदी शिनेमात बी न्हाय पायलं तेस्नी.  राजकारनात सुदिक येकच विदेशी सून हाय. मग ही नवी सूनबाई कोन म्हनतुया मी?” दाजींना काही कळेनासे झाले होते. भाऊ मुंबईला गेलेला, ४ बुकं शिकलेला  हुशार मनुष्य, त्याला जगाची माहिती होती, मुंबईचे मराठी आणि दोन चार इंग्रजी वाक्येही तो लिलया बोलू शकत होता.

“ही शिनेमातलीच हाये पर आपल्या किस्ना, रंग दे बसंती आन त्या भागमभाग मदली बाय नाय. ही विदेशी शिनेमातच काम करतीया, म्या पायला होता मागं, आयटम बाई हाय, आन तो बाप्याबी विदेशातच राहतुया.”

“प्वारगी बरी हाय रे दिसाया, जोडा कसा लक्श्मी नारायनागत दिसतुया.” बायजाक्कानेही डोळे भरून वर्तमानपत्रावरचा फोटो पाहून घेतला.

“कसचं आलया लक्श्मीनारायन आक्का? लेकुरवाळी हाय ती आनि वय हाय येक्केचाळिस आन तो बाप्याबी दुसर्‍या लग्नाचा हाये.” भाऊंनी मौलिक बातमी पुरवली.

“काय म्हनतूस? मंग ह्यो इतका गाजावाजा कशापायी? तिचंबी दुसरं लगीन आसल का रं?… तुला सांगतुया आमच्या बायजाक्काला येक्केचाळिसाव्या वर्सी जावय आला व्हता. या परदेसातल्या बायका बाकी जंक्शन,  नायतर आमची बायजाक्का बगा, शेंगदान्याच पोतं बरं! आता सांग हिचं आपल्या पयल्या दादल्याशी काय बिनसलं?”

“अवं दाजी! हिला पयला नवराच न्हाय. मित्र व्हते दोन-चार. त्यातल्या येकाला तिनं सांगितलं की तूच माज्या प्वाराचा बाप! तो म्हनाला नाय मानत जा! बास! फाटलं की वं त्यांच. ”

“ह्ये घ्या! देसी नायतर विदेसी ह्ये विश्वामित्र समद्या जगात हाय म्हनायचं. बाप्यांची जातच मेली वंगाळ” दाजींच्या नसत्या टीप्पणीचा वचपा काढत बायजाक्काने तोंड उघडले.

“तू गप ग! दोन मान्स बोलत आसताना मदे मदे तोंड नगं खुपसू.” दाजीने बायजाक्काला दटावले.

“आरं भाऊ पर मला सांग हे दोगे लगीन करायला हितं का आले?”

“म्हायत नाय बा! त्या परमेस्वर आनि आदीने बोलावलं आसल.”

“ह्ये कोन परमेस्वरराव आनि आदीताई?” बायजाने पुन्हा तोंड घातले.

“आक्का! चुकलीस बग! परमेस्वर बाई हाय आनि आदी बाप्या. त्यानी चौपाटीवर मंडप टाकून लई जंक्शन तयारी केलीया लग्नाची.”

“आरं पर मला अजूनशान न्ह्याय कळलं की या दोगांनी येवडं मोटं काय केलंया की प्येपराच्या पयल्या पानावर तेंचे फोटु लावल्यात? आमचा बळीराजा आत्महत्या करतुयां, ती मुंबै-पुन्याची मानसं वीज टंचाईने कावली हायेत, ह्यी रोजची गुनेगारी वाढतीया, आनं ते समदं सोडून ह्ये दोगे का रं पयल्या पानावर?”

“आवं ह्यी मुंबै-पुन्याची मानसं अशा लोकास्नी ‘रोल म्वाडल’ म्हनतात. तेंच्यासारखं दिसायचं, वागायचं, बोलायचं मंजी रोल म्वाडल, मग त्यांचे फोटु नकोत का पयल्या पानावर?”

“आरं माज्या द्येवा! ह्यो बाप्या काडीमोड झालेला, ती बाय पोरास्नी घेऊन लगीन करतीया. चाळीशी उलटलेलं आनि तोकड्या कपड्यात झोंबाझोंबी करत फिरनारं ह्ये रोल म्वाडल?  आनि मग ते आपलं मेधाताई, अन्ना, ते अभय बंग, बाबा आमटे ह्ये कोन म्हनायचं? राजा, पेकाट म्वाडलं रे माजं या बाता आयकून आनि येक सांग यांचं लगीन टिकलं का रं?”

“दाजी तुमी अडानी मानूस! किती कावताय, कशाला नसत्या पंचायती करताय? आवं आमच्या पुन्या-मुंबैची मानसं बी इतका इचार न्हाय करत. गुमान टिवी, प्येपरात या दोगांना बगतात आनि बातम्या चगळतात, तुमी या टिचभर गावात राहून कशापाय तरास करून घेताय? सोडा की वं राव, या मी तुमाला या दोगांच्या ड्रायवरची, घरगड्याची मुलाखत आलीया प्येपरात ती वाचून दावतो आनि मग मुंबैची एसटी पकडतो, कुनाला म्हाइत उद्या चौपाटीवर पार्टी व्हताना चने शेंगदाने विकनारा म्हनून ह्ये टिवीवालं माजीबी मुलाखत घीतील.”

 ****

4 टिप्पणियां

 1. संगीता said,

  भन्नाट आहे तुझा ब्लॉग! लिहित रहा.

 2. yogesh said,

  too good 😀

 3. Archana said,

  sahi!

 4. bedhadak said,

  वाचकहो धन्यवाद! 🙂

एक उत्तर दें

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदले )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदले )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदले )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदले )

Connecting to %s

%d bloggers like this: