त्याच्या डायरीतील काही पानं!
काल कोणीतरी कोणाच्यातरी डायरीतील पाने झेरॉक्स करून आणली होती. ती इथे टंकत आहे.
फेब्रुवारी १९, २००९
ऑस्कर दोन दिवसांवर येऊन ठेपलं आहे. सर्व कलाकार, पोरं-टोरं त्या ऑस्करला निघालीसुद्धा. बघा काय नशीब असतं एकेकांचं. नाहीतर आमचा गधडा अभिषेक. इतके टेकू दिले तरी अद्याप दोन पायांवर लंगडतं आहे घोडं. सूनबाई बघा, तिला यावर्षी पद्मश्री मिळवून मोठ्यांच्या पंक्तीत बसवलं. ती खूप ग्रेट आहे म्हणून नाही, गधडी मोठी झाली आहे हे दाखवायला. केस पांढरे व्हायची वेळ आली, (तिचे केस, माझे आणि जयाचे कधीच पांढरे झाले.) आता तरी नातवंडांचं तोंड दाखव म्हणून थोरा-मोठ्यांच्या सोबत पद्मश्री दिलं. एकच दिलासा आहे की आमची ऍश एकदाची हॉलीवूडपर्यंत पोहोचली. पण ऑस्करचे काय?
तिथे पोहोचण्याचे प्रयत्न या वयात मलाच करावे लागणार असं दिसतं आहे. माझ्याशिवाय स्लमडॉगला ऑस्कर मिळणे अशक्य आहे.
फेब्रुवारी २०, २००९
मागे मी माझ्या ब्लॉगवर स्लमडॉगविषयी बोललो आणि लोकांनी जे तोंडसुख घेतलं त्यामुळे मी हल्ली स्लमडॉगबद्दल फक्त माझ्या डायरीत लिहितो. माझ्या उल्लेखाशिवाय हा चित्रपट तरणे कठिण होते. तो अनिल लेकाचा, चुचुंद्रीसारखं तोंड करून स्लमडॉगमधल्या कौबकचा शो-होस्ट बनला. दाढीचे खुंट वाढवले की आपण अमिताभ बनू शकतो असं हल्ली अभिलाही वाटतं तर या अनिलला काय बोलावं? या चित्रपटाच्या यशाचा खरा धनी मीच पण माझे आभार मानण्याची पद्धतसुद्धा या ब्रिटिशांना नाही. पुढल्या महिन्यात लंडनला शो करेन तेव्हा हे बोलून दाखवेन म्हणतो.
मुंबईतली गरिबी दाखवून ऍवॉर्डस मिळवायची फॅशन आली आहे. झोपडपट्टी, अत्याचार, भ्रष्ट पोलिसी यंत्रणा दाखवली की झाला चित्रपट तयार. कुठे आहे ही गरिबी? मी ७० च्या दशकात चित्रपट करायचो तेव्हाही प्रकाश मेहरा माझ्यासाठी खास इटालियन लेदरचं जर्किन घेऊन यायचा. त्यावर काजळाचे फर्राटे मारले की झाले मजदूरचे कपडे. सर्वकाही इतकं सोपं असताना रिऍलिटी शो सारखे चित्रपट कशाला बनवायचे? हिम्मत असेल तर मुंबईतल्या श्रीमंतांवर चित्रपट बनवून ऑस्कर मिळवून दाखवावेत.
चला अनिलकडे पार्टी आहे. अनिल कपूर नव्हे, तो चिचुंद्र्या तर अमेरिकेला जाऊन प्रत्येक कॅमेरासमोर चुकचुकतो आहे. अनिल अंबानीकडे जायचे आहे.
फेब्रुवारी २१, २००९
रेहमानला ऑस्कर नक्की मिळेल. तीन गाण्यातली दोन गाणी त्याचीच तेव्हा अंदाज कसले बांधायचे. निकाल कसा फोडला जातो ते दिसतंच आहे. ब्लॉगवर एक पोस्ट टाकतो की ही गाणी रेहमानच्या कारकिर्दीतली श्रेष्ठ गाणी नाहीतच. पब्लिकला माहित नसते की ऑस्कर हा वार्षिक पुरस्कार आहे आणि त्या वर्षातल्या चांगल्या हॉलिवूड गाण्यांनाच दिला जातो. काल एका मराठी संकेतस्थळावरही असेच काहीसे वाचले. करा लेको हंगामा! गुलझारसाहेबांना ऑस्कर मिळायला हवे. बाबूजीही ऑस्कर मिळवू शकले असते पण थूत अशा परदेशी ऍवॉर्डसवर.
तो देव पटेल बघा, आंग्लाळलेला स्लमडॉग. झोपडपट्टीतला दिसतो तरी का? आमचा अभिषेक काय वाईट होता पण त्याचा विचारही झाला नाही. या पोराचे करिअर कसे मार्गी लागणार या चिंतेत केवळ माझ्या दाढीचेच केस पांढरे झाले आहेत.
फेब्रुवारी २२, २००९
डॅनी बॉयलला तातडीने फोन करून स्पष्ट केलं की माझ्या ब्लॉगवर मी माझ्या मनात येईल तसे लिहितो. काही सुप्रसिद्ध मराठी ब्लॉगधारकांकडून मी हा गुण घेतला आहे. स्लमडॉगला ऑस्कर मिळो अशा शुभेच्छाही दिल्या. घाईत होता म्हणून अभिषेकला पुढच्या चित्रपटात घेशील काय असे विचारून टाकले. त्याला कळले नसावे. माझ्यासाठी नवा रोल तयार केला म्हणत होता.या वयातही मला उसंत नाही या कार्ट्यामुळे.
शेवटी ऑस्कर मिळालेच रेहमानला पण बघा मी नव्हतं म्हटलं की माझ्याशिवाय ऑस्कर पूर्ण होणार नाही. तिथेही पठ्ठ्या दिवारचा डायलॉग म्हणून गेला. तसा तो डायलॉग शशीच्या तोंडी होता पण “मेरे पास माँ है|” असं म्हटल्यावर आठवण अजूनही माझीच येते. तबियत खूश झाली.
फेब्रुवारी २३, २००९
ब्लॉगवर अभिनंदन करायला हवे. शेवटी अभिच्या आयुष्याचा प्रश्न आहे.
जय हो!
उबग
’लोक तरी साले काय असतात एक एक? एथिक्स नावाची गोष्टच शिल्लक उरलेली नाही.’ सायबाने आज जोड्याने हाणली होती ते त्याच्या डोक्यातून काही केल्या जात नव्हते. पुडीतले शेवटचे दोन चणे त्याने घशात ओतले आणि पुडी चुरगळून रस्त्यावर भिरकावून दिली. घरापाशी आल्यावर त्याने आपले तोंड शर्टाच्या बाहीला पुसले. गल्लीच्या तोंडाशी कचर्याचा हा एवढा ढीग पडला होता. म्युनिसिपालटीची गाडी कचरा न्यायला आलीच नव्हती. लोकांनी घरात साचलेला कचरा आणून गल्लीच्या तोंडाशी टाकला होता.
’रस्त्यावर कचरा टाकतात. सुधारणार नाहीत लेकाचे.’ त्याने तोंड वेंगाडून नाक दाबले तरी नाक हुळहुळायचे थांबले नाही. “आक्छी! आक्छी!’ कचर्याच्या सुवासाने नाक साफ झाले. हाताला लागलेला शेंबूड कुठे पुसावा हे त्याला कळेना. इमारतीच्या भिंतीपेक्षा चांगली जागा त्याला दिसली नाही तशी त्याने हात भिंतीला पुसून घेतले.
घराच्या पायर्या चढता चढता त्याला सकाळच्या भांडणाची आठवण झाली. ’बायकोला कैदाशीण म्हणालो होतो नाही?’ आता कोणत्या पिंजर्यात रवानगी करते कोणास ठाऊक? कपाळावरचा घाम पुसत त्याने बेल दाबली. दरवाजा उघडला तसे त्याने थेट बाथरूम गाठले आणि पाण्याचे दोन तांबे डोक्यावर रीते केले. ’काहीतरी कारण काढून या ब्यादेचे तोंड बंद ठेवायला हवे. कटकट साली. बोलायला लागली की नको जीव करते.’ डोकं खसाखसा पुसत बाहेर येत त्याने खुंटीवरचे जानवे काढले आणि गळ्यात घातले.
’च्यामारी! डाव्या खांद्यावरून घालायचे की उजव्या?’ मनात विचार करत त्याने गजानन महाराजांची पोथी काढली आणि मनोभावे वाचायला सुरुवात केली.
’आज काय नवं नाटक? देवभक्तीचं?’ कानावर टोमणा आला तसे त्याने दुर्लक्ष केले आणि वाचन सुरु ठेवले. एव्हाना बायकोच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला होता. ’जळ्ळा मेला जन्म बायकांचा! या पुरुषांनी उठावं आणि काहीही बोलावं….’ त्याने वाचताना एक उसासा सोडला.
’ट्रींग…’ दाराची घंटा वाजली तशी त्याच्या मनाला उभारी आली. कोणीतरी घरी आलं होतं, चला त्यानिमित्ताने हिचं तोंड गप राहील. तो धडपडत उठला आणि दार उघडायला गेला.
’कोण होतं?’ त्याला दरवाजा बंद करताना पाहून बायकोने विचारलं.
’पोष्टमन!’ त्याने हिरमुसले होऊन उत्तर दिलं.
’पोष्टमन या वेळेला?’
’ओवरटाईम करतात म्हणाला. जाऊ दे! कोणतीतरी बिलं आली होती माझ्या नावावर ती द्यायला आला होता. जेवायला बसूया का?’ त्याने नरमाईने विचारलं.
’अडलंय माझं खेटर! सकाळचं भांडण विसरलात का? राहा आज उपाशी.’ ती नेहमीप्रमाणे तावातावात.
’आं? खेचर… हा खेचर कसा उपटला?’ त्याने कपाळाचा घाम पुन्हा एकदा पुसला.
’कान घ्या तपासून… नाहीतर असं करा डोकंच घ्या तपासून.’ ती फुरंगटली की जरा जास्तच जाडी दिसायची.
काही न बोलता तो गुमान गादीवर पडला आणि डोक्यावर चादर ओढून चुपचाप पडून राहिला. डोकं भणाणत होतं, पोटात कावळे कोकलत होते, हात आणि तोंड शिवशिवत होतं पण त्याला या सर्वाचा “उबग” आला होता. ’आज काही न बोलता झोपूया सालं! आजचा दिवसच वाईट गेला. उबग आलाय सर्वाचा… उद्या नवा दिवस सुरु झाला की बघून घेईन एकेकाला.’ … आणि तो डोळे मिटून घोरण्याचं नाटक करू लागला.
आय हिक्क!
“आय हिक्क!…… आय हिक्क!” बबन्याच्या उचक्यांना उधाण आले होते.
“आरं! पानी पी की तांब्याभर, किती उचकी लागलीया?” बायजा कावून म्हणाली.
“आये! पानी प्यालं की गं, पन ही उचकी लई भारी दिसतीया, जायचं नावच काढीना. आय..हिक्क!”
“उचकी हाय. ती कायमची न्हाय राहायची… यील सतवील आनी जायील गुमान.”
“आगं आये! तुला काय म्हाईत न्हाई बगं! ही उचकी जानार्यातली न्हाई. ती हितंच असतीया, अदनंमदनं तिला उबळ येतीया…आय हिक्क!… ही अश्शी.”
“जानार्यातली न्हाई, हितचं असतीया, म्हंजी काय रं बबन्या? आसं येड्यावानी काय बोलतुया?” एव्हाना बायज्जाक्काला काळजी वाटायला लागली.
“आगं! येड्यावानी न्हाई आये. हा उचकी हितंच असतुया, अजीर्न झालं की आय..हिक्क म्हनत भायर पडतुया.”
” बबन्या तुजं काय खरं न्हाय… हा उचकी? आरं उचकी बाईवानी असतीया. ही उचकी म्हनतात.”
“आये सांगितलं ना तुला… ह्ये उचकी प्रकरन जंक्शन हाय. हा की ही त्येच कळेनासं झालंय…. ह्या उचकीचा माग लागत न्हाई तोवर आय…हिक्क ‘चांगभलं!! सदानंदाचा येळकोट!’ आसं म्हनायचं आनि गप्पगुमान राहायचं इतकच आपल्या हातात हाय….. आय हिक्क!”
“आरं माज्या कर्मा काय बोलतुस रं लेका? सकाळच्या पारी काय तरी वंगाळ पिऊन न्हाईना आलास?” पोरगा काय बोलतोय ते बायजाच्या डोक्यावरून जात होते.
बबन्या गालात हसला. काहीतरी बोलायला म्हणून त्याने तोंड उघडलं तशी पुन्हा उचकी आली.
“आय…हिक्क!”
गोष्ट एका माठ्याची!!
या गोष्टीतील व्यक्तींत आणि स्थळांत कोणालाही जिवंत किंवा मृत व्यक्तींत किंवा परिचित स्थळांत साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.
एक आटपाटनगर होतं. त्या नगरात सर्वत्र सुबत्ता, आनंद नांदत होता. रामराज्यच जणू. सगळे प्रजाजन आनंदी होते. ते राजाला, एकमेकांना दुवे देत, मदत करत, गुजगोष्टी करत, जणू एक अखंड कुटुंब. राजाला आपल्या प्रजाजनांवर कोण विश्वास. त्याच्या गैरहजेरीतही राज्याचे सर्व कारभार सुरळीत चालत होते. राजा महालाबाहेर पडेनासा झाला. कालांतराने आपला राजा कसा दिसतो हे लोक विसरायला लागले.
अशातच, एक दिवस त्या नगरात माठ्या नावाच्या एका विदूषकाचे आगमन झाले. नगरातील मोक्याच्या ठिकाणी माठ्याने आपले कार्यक्रम ठेवले. विदूषकाला रूप बदलण्याची कलाही अवगत होती. केंव्हाकाळी तो ‘भावना प्रधान’ या स्त्रीचे रूप घेई, केंव्हा केंव्हा “भों भों भुंकणार्या कुत्र्याचे” तर केंव्हा बोबडे बोलणार्या लहान बाळाचे. लोकांना माठ्याची सगळी रुपे आवडली. मुक्तकंठाने त्यांनी त्याचे कौतुक सुरू केले. माठ्याही सुखावला, आनंदला. आता नगरांत काही लोक डांबीस असायचेच. त्यांनी माठ्याला हरभर्याच्या झाडावर चढवले. काही लोकांनी तर माठ्याला ‘तूच आमचा राजा! तुझ्यामुळेच आमच्या नगरात सगळ्यांच्या चेह्र्यावर हसू उमटते, नगरात सुबत्ता नांदते’ असे सांगायला सुरुवात केली. माठ्या काही मूर्ख नव्हता पण त्याला हळूहळू लोकांचे म्हणणे पटू लागले. काही शहाणे लोक मात्र जगाची रीत असल्यागत मूग गिळून गप्प बसले.
आता माठ्या आपल्याला नगराचा स्वामी समजू लागला. लोक माठ्याला मुजरा करत, त्याला साष्टांग दंडवत ठोकत. माठ्याही आपल्या लंब्याचौड्या गप्पांनी लोकांना भुलवत असे. नगरात नव्याने येणारे लोक माठ्यालाच राजा समजू लागले. असे करता करता, माठ्याच्या गर्वाच्या झोपडीचे महालात रुपांतर झाले. माठ्या स्वत:ला नगराचा शासक समजू लागला.
मग एके दिवशी गावात सुंद आणि उपसुंद या बंधूद्वयीचे आगमन झाले. नगरात लोक माठ्याला राजा समजतात हे त्यांना सहन होईना. त्यांनी ‘कला’गती लावायला सुरुवात केली. लोकांना आपल्या नगरावर, शांततेवर, सुबत्तेवर आक्रमण झाल्यासारखे वाटू लागले. माठ्याला पुढे करून आपापल्यापरीने त्यांनी हे आक्रमण थोपवून धरण्याचा प्रयत्न केला. माठ्यानेही आपली गादी जाते आहे अशा आवेशात मुकाबला केला पण सुंद-उपसुंदही अनेक कलांगतीत पारंगत असल्याने माठ्याची डाळ शिजेना. कालांतराने नगरातील लोकांत फाटाफूट होऊ लागली. माठ्याचा पक्ष, सुंदाचा पक्ष, उपसुंदाचा पक्ष असे अनेक पक्ष होऊन नागरिक एकमेकांविरुद्ध उभे ठाकले. काही शहाणे लोक मात्र जगाची रीत असल्यागत मूग गिळून गप्प बसले.
सुंदाला नगराचे स्वामित्व हवे होतेच, इतर दोघांपेक्षा तो थोडा जास्त हुशार होता, त्याच्या शब्दांना एकप्रकारचा लेहजा होता. , यावर त्याने एक तोडगा काढला आणि प्रीतीभोजन आयोजित केले. त्या समारंभाचा प्रमुख पाहुणा म्हणून माठ्याला आमंत्रित केले. माठ्या मुलखाचा विदूषकच, तो उड्या मारत समारंभाला गेला. सुंदाच्या बगलेत बसून जेवणखाण केले, पेयपान केले आणि तारेत मित्रत्वाच्या शपथा घेतल्या. दोन्ही पक्षांतील लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या घटनेचे स्वागत केले. काही शहाणे लोक मात्र जगाची रीत असल्यागत मूग गिळून गप्प बसले.
येथे उपसुंदाचे काहीतरी अजबच चालले होते. त्याने राजालाच गाठले, ‘तुमचा कारभार बरोबर नाही, पद खाली करा’ अशी राजावर नोटिश ठोकली. राज्य चालवता येत नसेल तर मला विकून टाका अशी घोषणा केली. त्याबरोबर नगरवासी हवालदिल झाले. उपसुंदाला ठोकून काढण्याचे सर्व उपाय योजायला लागले. त्या काळात अचानक माठ्याने पलटी खाल्ली. विदूषकच तो, कोलांट्या उड्या मारण्यात त्याचे हातपाय कोण धरणार? उपसुंद आणि माठ्याचे दोस्ती प्रकरण शोलेमधल्या जय आणि विरूपेक्षाही गाजायला लागले. काही शहाणे लोक मात्र जगाची रीत असल्यागत नेहमीप्रमाणेच मूग गिळून गप्प बसले.
आता राजाला जाग आली. आपले राज्य कोणीतरी भलतेच चालवते आहे याची त्याला प्रचीती येऊ लागली. राजाच्या दरवाजावर असणारी भलीजंगी घंटा त्रस्त नागरिकांनी बडवायला सुरुवात केली होतीच. राजाने मग, नागरिकांवर अनेक निर्बंध लादले, माठ्या, सुंद-उपसुंद यांची गळचेपी केली. ओल्याबरोबर सुके जळते या न्यायाने राजाने सर्वच नागरिकांची पिळवणूक करायला सुरुवात केली. काही शहाणे लोक मात्र जगाची रीत असल्यागत नेहमीप्रमाणेच मूग गिळून गप्प बसले.
माठ्या राजाला शिव्याशाप द्यायला लागला. त्याला काबुली चण्याच्या झाडावर चढवायला सुंद-उपसुंद तयार होतेच, पण झाल्या प्रकारातून सुंद-उपसुंद जे शिकले ते माठ्या निम्म्यानेही शिकला नाही. माठ्याच्या तळपायाची आग, हृदयातली तगमग आणि डोक्यातली राख इतकी वाढली की माठ्याने आटपाटनगराला राम राम ठोकला आणि घर देता का घर अशी आरोळी ठोकत तो इतर राज्यांच्या आश्रयाला गेला. काही शहाणे लोक मात्र जगाची रीत असल्यागत नेहमीप्रमाणेच मूग गिळून गप्प बसले.
माठ्याची ख्याती इतर राज्यांतही पोहोचली होतीच त्यामुळे ते राज्यकर्ते माठ्यापासून बिचकून राहायला लागले. माठ्या नाराज झाला, जिवाची तगमग थांबेना. तेलही गेले तूपही गेले अशी परिस्थिती होऊन गेली. आप्तस्वकीय सोडून गेले. भळभळा वाहणारी जखम उराशी घेऊन माठ्या आता घर शोधत फिरतो…… घर देता का घर असे उदास प्रश्न विचारतो…. आणि काही शहाणे लोक मात्र जगाची रीत असल्यागत नेहमीप्रमाणेच मूग गिळून गप्प बसलेले दिसतात.
भिंत देता का भिंत
आजच्या लोकसत्तेत एक बातमी वाचली – दीवार मधील अमिताभच्या तोंडचा संवाद “साब पैसे उठाकर हातमें दीजीये, मैं फेके हुए पैसे नहीं उठाता।” हे चक्क सातवीच्या समाजशास्त्र आणि राजकीय जीवन या विषयाच्या पुस्तकात छायाचित्रासकट टाकले आहे. हे वाचून आम्ही धन्य झालो. इतर चित्रपटांच्याबाबतीत आपपरभाव होतो आहे की काय अशी शंका आमच्या पापी मनाला चाटून गेली. आमचे काही आवडते संवाद कोणत्या विषयांत चपखल बसतील ते पाहा –
१. चिनायसेठ, जिनके खुदके घर शीशेके होते है वोह दुसरोंपर पत्थर फेंका नहीं करते। – भौतिकशास्त्र.
२. जबतक बैठने को ना कहा जाये खडे रहो। ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बापका घर नहीं। – नागरिकशास्त्र.
३. कितने आदमी थे? सरकार २। वो दो थे और तुम तीन…. सोडवा गणित. 😉
४. एक लडका और लडकी कभी दोस्त नहीं हो सकते। – रसायनशास्त्र.
५. ये हाथ मुझे दे दे ठाकूर। – कार्यानुभव.
६. मैं तुम्हारे बच्चेकी मॉं बननेवाली हूँ। – जीवशास्त्र.
यांनाही कोठेतरी स्थान द्या हो. आवडतात आम्हाला हे संवाद.
तुमच्याकडे असे संवाद विषयांसकट असतील तर कळावे,
आपला,
बेधडक डोईफोडे.
(नाहीतर मग भिंत देता का भिंत असे कशाला मागत होतो? डोके फोडून घ्यायलाच की.)
उडता मामला
“काय सांगू बाई मिसेस श्रीवर्धन, इतका गब्रू जवान गेल्या कित्येक वर्षांत नाही पाहिला… आहाहा! ते त्याच्या समवेत उडणे, ते त्याचे गालातल्या गालात हसणे, ते कपाळावरले केस मागे सारणे, त्याची ती अदब, बोलण्यातली मिठ्ठास …कलिजा खलास. तुम्हाला म्हणून सांगते, त्याला सांगितलं की मी पहिल्यांदाच प्रवास करत्ये, जरा सीटबेल्ट लावून दे ना, प्लीऽऽज…. अस्स वाकून त्याने सीटबेल्ट लावला… हो हो! म्हणजे काय हे होते ना बरोबर, आपले विमानाच्या खुर्चीत न मावणारे शरीर इतर वेळेला गंजीफ्रॉकात आणि प्यांटीत खोचून बसवतात ना तसेच त्या खुर्चीत स्वत:ला कोंबून ढाराढूर झोपले होते…. प्रवासात माझी अशी बडदास्त होती की नाही, अगं बर्याच दिवसांनी ‘आंटी’ न म्हणणारा सुकुमार भेटला. दोन दोनदा तुम्हाला ड्रिंक हवं का विचारून गेला…. नाही गं कोल्डड्रिंक….इश्श! त्यांना का म्हणून सांगू, इतर वेळेला ते त्या बाहुल्यांबरोबर कसे वागतात ते सांगतात ना मला… काय काय कल्पनाविलास असतात बाई या पुरुषांचे…. मला बाई फक्त त्याच्या गालातल्या गालात हसण्याने गुदगुल्या झाल्या….नाही हो तसं म्हटलं मी यांना घरी आल्यावर की काय मसल्स होते, काय तगडा तरणाबांड होता… तर तर.. म्हणाले चळत्येस, किती वयाची झालीस ते विसरलीस की काय?….. वयाने इतक्या लहान पोराबद्दल असे काही बोलायला लाज नाही वाटली….. हट! आपण नाही विचारत असल्या दटावणीला….इतकी वर्षं यांनी मजा केली, काय काय वर्णने त्या बायांची… आणि मी बापडीने एकदा डोळे भरून पाहिले तर चळते म्हणे..या पुरुषांच्या दुटप्पीपणाचा अस्सा राग येतो, हे वर्णने करणार तेव्हा काय रसिक हो, किती दिलखुलास, किती जाण यांना सौंदर्याची असे म्हणायचे आणि आम्हा बायकांच्या आहाहा! लाही अश्लील म्हणायचे….जाऊ दे! सोडा हो, तुम्ही ही एक विमानप्रवास करून या… हे झोपले होते ना तेव्हा त्याच्या सर्व फ्लाईट्सचे शेड्युल घेतले आहे. कधी निघताय सांगा…”
मंदिराची साडी
“आवं उद्या पुन्याला जाऊया” बायजाक्काने गळ घातली.
“का वं? आसं एकदम उठून पुन्याला का?” दाजींनी प्रश्न केला.
“मला नवी साडी घ्यायची हाये.”
“आगं! पन तालुक्याच्या बाजारात मिळल की. त्यासाटी पुन्याला का जायचं?”
“मला पेशल साडी हवीय अवंदा. साडीवर पंढरी, कोल्हापूर, आट इनायक आनि म्हाराष्ट्रातील समद्या मोट्या मंदिरांची चित्र हवीत.”
“ऑं! आनि ती कशापायी?”
“आवं! आता आषाढी येकादशी येईल, नागपंचमी, गनपती, गौरी. आपल्याकडं सनासुदीला ह्ये इतकं दिवस हायेत, मंग पेशल साडी नगं का?”
“पर आसं मंदिरांचं फोटू चिकटवलेली साडी गावेल का?”
“न गावायला काय झालंया? त्या मंदिराला गावली की वं! ती बगा अंगभर देसांच झेंड लावून आली होती. काय झ्याक दिसते बाय! मला पन अशीच साडी हवी.”
“आस्स!!! आता कळतया की तुज्या टकुर्यात काय हाय ते आनि लोकांनी बोभाटा केला तर? मंजी सरळ सांगायचं तर बसायच्या जागंवर येखादं मंदिर आलं तर काय करायचं? मानसं बगून घेनार न्हाईत. शिमगा करतील.”
“ते का वं! मंदिरानं केलं तर कवतुकानं बगतात. म्या बाईने केलं तर कशापायी वरडतील?”
“नाय गं! मंदिरानं केलं तरी बी वरडतातच हायेत.”
“आनि त्यानं काय व्हनार ते सांगा? मंदिराला चार शिनुमे मिळतील, टिवीवरच्या दोन मालिका मिळतील. चेंडू-फळी तर आजकाल लोक तिच्यापायीच बगतात. मी सांगते ते आयकाच, मला साडी घिऊन द्या. लोकांनी ठनाना क्येला तरी नंतर फायदा माजाच हाय.”
“आता यात फायदा कोन्ता म्हनतू मी, बायजा?”
“आवं, निवडनूक हाय सरपंचाची. या टायमाला बाई सरपंच पायजे ना. तुमीच म्हनाला ना की तू उबी रहा म्हनून. आता मला बाईला कोन वळखतंय आनि मत देतयं? ह्ये लोकांनी आपल्याला वळखायंच मंजी कायतरी जंक्शन कराया लागतं बगा! मला साडी घिऊन द्या, न्हाय समद्या गावांत माजा बोलबाला झाला तर बगा.”
“बायजे! मानलं गं बाई तुला. आगं तू म्हनतेस त्यात प्वाईंट हाय बाकी. तुला उद्याच्या पैल्या गाडीने पुन्याला घिऊन जातू.”
कारणे द्या नोटिस – १
गेले काही दिवस आम्ही भयंकर व्यग्र होतो. आमच्या काही मित्रांना आम्ही काय करत होतो हे जाणायचे आहे या इच्छेतून इतक्या दिवसांत आम्ही कोणते पापड लाटले ते सांगणारे भाग उलट्या क्रमाने येथे टंकत आहोत.
तर, अगदी आता आतापर्यंत आम्ही “कारणे द्या” नोटीशीला उत्तर देत होतो. नाही! कोणाला कारणे द्यावीत असा आमचा पिंड नाही आणि असे आम्ही फारसे काही उपद्व्याप केलेलेही नाही परंतु आमच्या दोघा खास मित्रमैत्रिणींवर ही नोटिस बजावण्यात आली होती आणि त्यांनी उत्तरे लिहायची जबाबदारी आमच्या गळ्यात टाकली. त्यापैकी पहिल्या कारणे द्या नोटिशीला आम्ही दिलेले उत्तर:
ही नोटिस आमचे परममित्र अभिषेक बच्चन यांच्यावर करिश्मा कपूर यांनी बजावली होती. नोटिशीत, कधीकाळी मोडलेले लग्न आणि आता लग्नाला न आमंत्रित केल्याबद्दल कारणे विचारली होती. तेव्हा अभिषेकच्या वतीने आमचे उत्तर पुढीलप्रमाणे.
श्रीमती करिश्मा कपूर यांस,
गोष्ट जुनी झाली म्हणून बदलत नाहीत. लग्न तुम्ही मोडले आणि तेव्हा कारणे देताना तुम्ही अभिषेकचे टुकार चित्रपट, त्यांच्या वडिलांचे आताही प्रसिद्धी पावणारे चित्रपट, जयाकाकूंचे तुमच्यापेक्षा लांब असणारे केस, तुमच्या मातोश्री बबिताताई यांनी प्रतीक्षा बंगल्यात वेगळी खोली देण्यास परवानगी नाकारणे असे अनेक मुद्दे उठवले होते. असो, आमचेही काही प्वाईंट होतेच तेव्हा आता आम्ही आमच्यावतीने कारणे देतो….
१. लग्नानंतर आदर्श सूनबाई बनून राहणार नाही असा तुम्ही घेतलेला पावित्रा. आपण जे जन्मभर सहन केलं त्याचा वारसा आता सुनेने चालवावा अशी आमच्या जयाकाकूंची माफक अपेक्षा होती, त्याला तुमची नाराजी दिसली. आमची ऐशू पहा कशी अंगभर पदर पांघरून उभी असते. मध्यंतरी जयाकाकूंना लाइफ टाईम पुरस्कार मिळाला तेव्हा खाली बसून डोळ्यातून पाणी काढत होती पोरगी. तिने जसे आम्हाला ‘क्रेझी कर डाला’ तसे तुम्ही कधी केले नाही म्हणून.
२. आपला चिरका आवाज आणि सालीचा म्हणजे करिनाचा हो! (गैरसमज नको) चिरका आवाज यांनी जयाकाकूंचे ब्लडप्रेशर वाढत असे. जन्मभर ते सहन करण्याची ताकद थोरल्या डॅडीसाहेबांतही नव्हती. आता पुन्हा लग्नाला आमंत्रित करून मंगलाष्टकांच्या वेळेस तुम्ही भगिनीगान सुरू केले तर गोंधळ, पळापळ उडायला नको म्हणून आमंत्रण दिले नाही, इतकेच!
३. मागे लग्न ठरले तेव्हा आपल्या मातोश्रींनी भरभक्कम हुंडा देते असे कबूल केल्याचे आठवते. हुंड्यात भरभक्कम म्हणजे त्या स्वत: याची आम्हाला कल्पना नव्हती. ती आल्यावर आम्ही हादरून गेलो.
४. आपल्या पिताश्रींनी प्रतिक्षावरील एका बैठकीत थोरल्या डॅडीसाहेबांचा संपूर्ण बार निकामी केल्याचे (अर्रर्र! संपवल्याचे) लक्षात आल्याने हे प्रकरण आपल्यालाच काय पण प्रत्यक्ष कुबेरालाही परवडणारे नाही हे आम्हाला लक्षात आले.
५. लग्नातील आपल्या काही अटी फारच जाचक होत्या. जसे, लग्नात शाहरुखला पहिल्या रांगेत बसवून अमरसिंहांना पाचव्या रांगेत बसवावे. किंवा तुमच्या लाडक्या गोविंदाची आणि कॉंग्रेसपक्षाचे बोर्ड लग्नसमारंभात लावावेत. हे ही आम्हाला परवडण्यासारखे नव्हते.
एवढे मुद्दे पुरेसे असावेत असे आम्ही समजतो.
कळावे, लोभ असावा.
आपला,
(चमचा) बेधडक.
पुढचे उत्तर सल्लूला.
कर्मन्यास: यातील कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये. हे प्रसंग केवळ कपोलकल्पित आहेत.
पुण्यदान
भारतीय संघाला पळवून नेले आहे आणि ५० करोड रुपयांची मागणी केली आहे. दोन दिवसांत पैसे मिळाले नाही तर संघाला पोत्यात घालून अरबी समुद्रात बुडवण्यात येईल. (बिशनसिंग बेदींवर दाट संशय आहे आमचा) तेव्हा तातडीने मदत पाठवा..
असा भ्रमणध्वनी संदेश आम्हाला सकाळीच आला.
आम्ही तातडीने पोती आणि मुसक्या आवळायला दोरखंड पाठवले आहेत. 🙂
आपला,
(जल्लाद)बेधडक.
आमचा विश्वचषकी त्रागा -३
ने रे देवा!
हे देवा
सोडव या मन:स्तापातून आणि लवकर बोलावणं धाड रे बाबा! आम्हाला नाही रे या क्रिकेटप्रेमींना…….
आम्हाला सट्टे लावायला, बेटींग करायला, दिवस टिव्हीसमोर बसून वाया घालवायला अजून काही दिवस दे रे. इतके झाले तरी या सर्वांना वेळ वाया घालवण्याची दुर्बुद्धी दे रे देवा!
त्या ढोणी, हरभजन आणि आगरकरला भोपळ्यांचे मळे दे रे!
तुझा (भोपळा),
बेधडक
आमचा विश्वचषकी त्रागा -२