आय हिक्क!
“आय हिक्क!…… आय हिक्क!” बबन्याच्या उचक्यांना उधाण आले होते.
“आरं! पानी पी की तांब्याभर, किती उचकी लागलीया?” बायजा कावून म्हणाली.
“आये! पानी प्यालं की गं, पन ही उचकी लई भारी दिसतीया, जायचं नावच काढीना. आय..हिक्क!”
“उचकी हाय. ती कायमची न्हाय राहायची… यील सतवील आनी जायील गुमान.”
“आगं आये! तुला काय म्हाईत न्हाई बगं! ही उचकी जानार्यातली न्हाई. ती हितंच असतीया, अदनंमदनं तिला उबळ येतीया…आय हिक्क!… ही अश्शी.”
“जानार्यातली न्हाई, हितचं असतीया, म्हंजी काय रं बबन्या? आसं येड्यावानी काय बोलतुया?” एव्हाना बायज्जाक्काला काळजी वाटायला लागली.
“आगं! येड्यावानी न्हाई आये. हा उचकी हितंच असतुया, अजीर्न झालं की आय..हिक्क म्हनत भायर पडतुया.”
” बबन्या तुजं काय खरं न्हाय… हा उचकी? आरं उचकी बाईवानी असतीया. ही उचकी म्हनतात.”
“आये सांगितलं ना तुला… ह्ये उचकी प्रकरन जंक्शन हाय. हा की ही त्येच कळेनासं झालंय…. ह्या उचकीचा माग लागत न्हाई तोवर आय…हिक्क ‘चांगभलं!! सदानंदाचा येळकोट!’ आसं म्हनायचं आनि गप्पगुमान राहायचं इतकच आपल्या हातात हाय….. आय हिक्क!”
”आरं माज्या कर्मा काय बोलतुस रं लेका? सकाळच्या पारी काय तरी वंगाळ पिऊन न्हाईना आलास?” पोरगा काय बोलतोय ते बायजाच्या डोक्यावरून जात होते.
बबन्या गालात हसला. काहीतरी बोलायला म्हणून त्याने तोंड उघडलं तशी पुन्हा उचकी आली.
“आय…हिक्क!”
गोष्ट एका माठ्याची!!
या गोष्टीतील व्यक्तींत आणि स्थळांत कोणालाही जिवंत किंवा मृत व्यक्तींत किंवा परिचित स्थळांत साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.
एक आटपाटनगर होतं. त्या नगरात सर्वत्र सुबत्ता, आनंद नांदत होता. रामराज्यच जणू. सगळे प्रजाजन आनंदी होते. ते राजाला, एकमेकांना दुवे देत, मदत करत, गुजगोष्टी करत, जणू एक अखंड कुटुंब. राजाला आपल्या प्रजाजनांवर कोण विश्वास. त्याच्या गैरहजेरीतही राज्याचे सर्व कारभार सुरळीत चालत होते. राजा महालाबाहेर पडेनासा झाला. कालांतराने आपला राजा कसा दिसतो हे लोक विसरायला लागले.
अशातच, एक दिवस त्या नगरात माठ्या नावाच्या एका विदूषकाचे आगमन झाले. नगरातील मोक्याच्या ठिकाणी माठ्याने आपले कार्यक्रम ठेवले. विदूषकाला रूप बदलण्याची कलाही अवगत होती. केंव्हाकाळी तो ‘भावना प्रधान’ या स्त्रीचे रूप घेई, केंव्हा केंव्हा “भों भों भुंकणार्या कुत्र्याचे” तर केंव्हा बोबडे बोलणार्या लहान बाळाचे. लोकांना माठ्याची सगळी रुपे आवडली. मुक्तकंठाने त्यांनी त्याचे कौतुक सुरू केले. माठ्याही सुखावला, आनंदला. आता नगरांत काही लोक डांबीस असायचेच. त्यांनी माठ्याला हरभर्याच्या झाडावर चढवले. काही लोकांनी तर माठ्याला ‘तूच आमचा राजा! तुझ्यामुळेच आमच्या नगरात सगळ्यांच्या चेह्र्यावर हसू उमटते, नगरात सुबत्ता नांदते’ असे सांगायला सुरुवात केली. माठ्या काही मूर्ख नव्हता पण त्याला हळूहळू लोकांचे म्हणणे पटू लागले. काही शहाणे लोक मात्र जगाची रीत असल्यागत मूग गिळून गप्प बसले.
आता माठ्या आपल्याला नगराचा स्वामी समजू लागला. लोक माठ्याला मुजरा करत, त्याला साष्टांग दंडवत ठोकत. माठ्याही आपल्या लंब्याचौड्या गप्पांनी लोकांना भुलवत असे. नगरात नव्याने येणारे लोक माठ्यालाच राजा समजू लागले. असे करता करता, माठ्याच्या गर्वाच्या झोपडीचे महालात रुपांतर झाले. माठ्या स्वत:ला नगराचा शासक समजू लागला.
मग एके दिवशी गावात सुंद आणि उपसुंद या बंधूद्वयीचे आगमन झाले. नगरात लोक माठ्याला राजा समजतात हे त्यांना सहन होईना. त्यांनी ‘कला’गती लावायला सुरुवात केली. लोकांना आपल्या नगरावर, शांततेवर, सुबत्तेवर आक्रमण झाल्यासारखे वाटू लागले. माठ्याला पुढे करून आपापल्यापरीने त्यांनी हे आक्रमण थोपवून धरण्याचा प्रयत्न केला. माठ्यानेही आपली गादी जाते आहे अशा आवेशात मुकाबला केला पण सुंद-उपसुंदही अनेक कलांगतीत पारंगत असल्याने माठ्याची डाळ शिजेना. कालांतराने नगरातील लोकांत फाटाफूट होऊ लागली. माठ्याचा पक्ष, सुंदाचा पक्ष, उपसुंदाचा पक्ष असे अनेक पक्ष होऊन नागरिक एकमेकांविरुद्ध उभे ठाकले. काही शहाणे लोक मात्र जगाची रीत असल्यागत मूग गिळून गप्प बसले.
सुंदाला नगराचे स्वामित्व हवे होतेच, इतर दोघांपेक्षा तो थोडा जास्त हुशार होता, त्याच्या शब्दांना एकप्रकारचा लेहजा होता. , यावर त्याने एक तोडगा काढला आणि प्रीतीभोजन आयोजित केले. त्या समारंभाचा प्रमुख पाहुणा म्हणून माठ्याला आमंत्रित केले. माठ्या मुलखाचा विदूषकच, तो उड्या मारत समारंभाला गेला. सुंदाच्या बगलेत बसून जेवणखाण केले, पेयपान केले आणि तारेत मित्रत्वाच्या शपथा घेतल्या. दोन्ही पक्षांतील लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या घटनेचे स्वागत केले. काही शहाणे लोक मात्र जगाची रीत असल्यागत मूग गिळून गप्प बसले.
येथे उपसुंदाचे काहीतरी अजबच चालले होते. त्याने राजालाच गाठले, ‘तुमचा कारभार बरोबर नाही, पद खाली करा’ अशी राजावर नोटिश ठोकली. राज्य चालवता येत नसेल तर मला विकून टाका अशी घोषणा केली. त्याबरोबर नगरवासी हवालदिल झाले. उपसुंदाला ठोकून काढण्याचे सर्व उपाय योजायला लागले. त्या काळात अचानक माठ्याने पलटी खाल्ली. विदूषकच तो, कोलांट्या उड्या मारण्यात त्याचे हातपाय कोण धरणार? उपसुंद आणि माठ्याचे दोस्ती प्रकरण शोलेमधल्या जय आणि विरूपेक्षाही गाजायला लागले. काही शहाणे लोक मात्र जगाची रीत असल्यागत नेहमीप्रमाणेच मूग गिळून गप्प बसले.
आता राजाला जाग आली. आपले राज्य कोणीतरी भलतेच चालवते आहे याची त्याला प्रचीती येऊ लागली. राजाच्या दरवाजावर असणारी भलीजंगी घंटा त्रस्त नागरिकांनी बडवायला सुरुवात केली होतीच. राजाने मग, नागरिकांवर अनेक निर्बंध लादले, माठ्या, सुंद-उपसुंद यांची गळचेपी केली. ओल्याबरोबर सुके जळते या न्यायाने राजाने सर्वच नागरिकांची पिळवणूक करायला सुरुवात केली. काही शहाणे लोक मात्र जगाची रीत असल्यागत नेहमीप्रमाणेच मूग गिळून गप्प बसले.
माठ्या राजाला शिव्याशाप द्यायला लागला. त्याला काबुली चण्याच्या झाडावर चढवायला सुंद-उपसुंद तयार होतेच, पण झाल्या प्रकारातून सुंद-उपसुंद जे शिकले ते माठ्या निम्म्यानेही शिकला नाही. माठ्याच्या तळपायाची आग, हृदयातली तगमग आणि डोक्यातली राख इतकी वाढली की माठ्याने आटपाटनगराला राम राम ठोकला आणि घर देता का घर अशी आरोळी ठोकत तो इतर राज्यांच्या आश्रयाला गेला. काही शहाणे लोक मात्र जगाची रीत असल्यागत नेहमीप्रमाणेच मूग गिळून गप्प बसले.
माठ्याची ख्याती इतर राज्यांतही पोहोचली होतीच त्यामुळे ते राज्यकर्ते माठ्यापासून बिचकून राहायला लागले. माठ्या नाराज झाला, जिवाची तगमग थांबेना. तेलही गेले तूपही गेले अशी परिस्थिती होऊन गेली. आप्तस्वकीय सोडून गेले. भळभळा वाहणारी जखम उराशी घेऊन माठ्या आता घर शोधत फिरतो…… घर देता का घर असे उदास प्रश्न विचारतो…. आणि काही शहाणे लोक मात्र जगाची रीत असल्यागत नेहमीप्रमाणेच मूग गिळून गप्प बसलेले दिसतात.
भिंत देता का भिंत
आजच्या लोकसत्तेत एक बातमी वाचली - दीवार मधील अमिताभच्या तोंडचा संवाद “साब पैसे उठाकर हातमें दीजीये, मैं फेके हुए पैसे नहीं उठाता।” हे चक्क सातवीच्या समाजशास्त्र आणि राजकीय जीवन या विषयाच्या पुस्तकात छायाचित्रासकट टाकले आहे. हे वाचून आम्ही धन्य झालो. इतर चित्रपटांच्याबाबतीत आपपरभाव होतो आहे की काय अशी शंका आमच्या पापी मनाला चाटून गेली. आमचे काही आवडते संवाद कोणत्या विषयांत चपखल बसतील ते पाहा -
१. चिनायसेठ, जिनके खुदके घर शीशेके होते है वोह दुसरोंपर पत्थर फेंका नहीं करते। – भौतिकशास्त्र.
२. जबतक बैठने को ना कहा जाये खडे रहो। ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बापका घर नहीं। – नागरिकशास्त्र.
३. कितने आदमी थे? सरकार २। वो दो थे और तुम तीन…. सोडवा गणित.
४. एक लडका और लडकी कभी दोस्त नहीं हो सकते। – रसायनशास्त्र.
५. ये हाथ मुझे दे दे ठाकूर। – कार्यानुभव.
६. मैं तुम्हारे बच्चेकी मॉं बननेवाली हूँ। – जीवशास्त्र.
यांनाही कोठेतरी स्थान द्या हो. आवडतात आम्हाला हे संवाद.
तुमच्याकडे असे संवाद विषयांसकट असतील तर कळावे,
आपला,
बेधडक डोईफोडे.
(नाहीतर मग भिंत देता का भिंत असे कशाला मागत होतो? डोके फोडून घ्यायलाच की.)