क्योंकी सांस भी कभी….
वेळ — सकाळी ११ ची.
स्थळ — स्वयंपाकघर.
काळ – अगदी आताचाच, पुढच्या महिन्यातला नाही तर त्याच्या पुढच्या.
स्वयंपाकघरातून हिंग, कढीपत्ता, मोहरीची चरचरीत फोडणी दिल्याचा आवाज आणि घमघमाट सुटला होता. वास जयाकाकूंच्या नाकात भिनला होता. त्यांनी आपल्या नाकावर पदर दाबून धरला आणि तरातरा त्या स्वयंपाकघरात शिरल्या. ऐशू कपाळावरची बट हलकेच बाजूला सारून घर्मबिंदू आपल्या पदराने टिपत होती आणि गॅसवरच्या पातेल्यात डोकावत काहीतरी ढवळत होती आणि ‘दय्या दय्या दय्या रे!’ असं काहीसं गुणगुणत होती.
जयाकाकूंनी तिला तावातावाने विचारले,”तुमी कि कोरो, बहु?”
“येन अम्मा? ” ऐशू तालात म्हणाली, “अभीसाठी बिस्सिबेळेअन्ना आणि रस्सम बनवते आहे.”
“छी! छी! अम्मा बिम्मा म्हणू नकोस मला आणि अभी रस्सम, फस्सम नाही खात. त्याला छोलार दाल, माछ, भप्पा दोई सगळे बंगाली पदार्थ आवडतात हो.” जयाकाकू ठसक्यात म्हणाल्या.
“भप्पा म्हणजे ते तुमचे भप्पी लाहिरी त्यांचे चिरंजीव का?” ऐशूने आपले सामान्यज्ञान पाजळले.
भस्सकन कुकरची वाफ निघावी तशा जयाकाकू फुदफुदल्या,”भप्पा म्हणजे वाफवलेलं. स्टीम्ड! काय बाई तरी अक्कल आहे.”
“हे पाहा माझी अक्कल काढायचं कारण नाही. विश्वसुंदरीचा किताब आहे माझ्याकडे तो काही केवळ माझ्या तोंडाकडे आणि फिगरकडे पाहून नाही दिलाय,” ऐशूच्या नाका, तोंडा, कानातून वाफा यायच्या बाकी होत्या, “अभीपेक्षाही माझी अक्कल जास्त आहे हे सगळ्या जगाला माहित आहे.”
“हो तर! एकतर तू त्याच्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिले आहेस त्यामुळे तुझी अक्कल जास्त असायचीच आणि दुसरं म्हणजे अभीने तुझ्याशी लग्न करायचं ठरवलं तेव्हाच जगाला कळलं हो की त्याची अक्कल किती आहे ते,” जयाकाकूंनी कुजकट टोमणा मारला.
ऐशूच्या हिरव्यागार टपोर्या डोळ्यांत पाणी तरारले. आपला लोरिएलचा कलर फॅब्युलस मस्कारा त्या अश्रूंत विरघळणार नाही याची पुरेपुर काळजी घेऊन तिने आपले डोळे टिपले.
“एंक गोत्थु! तुमच्या मनात ती बंगाली राणी होती, मी अभीला गटवलं म्हणून तुमची धुसफुस सुरू असते.”
“हो तर! तुम्ही मद्रासिणी सगळ्याच तरबेज आहात पुरूषांना गटवण्यात. हेमा, श्रीदेवी, जयाप्रदा, तू”
“मस्त उपकारा!”, फणकार्याने ऐशू म्हणाली,”मी मद्रासी नाही पण तुम्हा उत्तर भारतीयांना ते सांगून फारसा उपयोग नाही म्हणा, आणि अम्मा! रेखाआंटीला विसरलांत का हो? ” आपल्या पापण्या फडफडवत ऐशूने लाडिक आवाजात विचारले.
जयाकाकूंना काय बोलावे सुचत नव्हते, संतापाने त्या धुसफुसत होत्या, “हे पहा आमच्या घरात राहायचं तर मिळून मिसळून राहावं लागेल.”
ऐशूने नाकाचा लाल झालेला शेंडा ओढला आणि सूंऽऽ असा दीर्घ श्वास घेऊन ती म्हणाली,”पुढल्यावेळी त्या ऑप्र्हा विन्फ्रीने मला बोलावलं ना तर तिला मी सरळ सांगणार आहे की आम्हा भारतीय बायकांना आपल्या आईवडिलांच्याच नाही तर सासू-सासर्यांच्या कह्यातही राहावे लागते. अजूनही या पारंतंत्र्यात खितपत पडलो आहोत आम्ही. एवढी हिर्यासारखी सून मिळाली तर त्याचे कौतुकही नाही तुम्हाला.”
“कौतुक आहे की पण हा हिरा है सभी के लिए त्याचं काय? तुझ्यासारख्या भारतीय बहुपेक्षा एखादी विदेशी बहु आणली असती तर परवडलं असतं पण विदेशी बहु म्हटलं की अमितच्या तळपायाची आग मस्तकाला जाते.” खट्टू होऊन जयाकाकू म्हणाल्या.
“जाणारच! त्यांनी तुम्हाला ‘लाभाचे पद’ म्हणून राज्यसभेचा राजीनामा द्यायला लावला, आणि मी; नाही तुम्हाला या स्वयंपाकघराचा राजीनामा द्यायला लावला तर पहा.”
आता डोळे टिपण्याची पाळी जयाकाकूंची होती. तेवढ्यात मागून तेजींचा आवाज आला,”घरोघरीच्या सविता आणि तुलसी तुमची जुगलबंदी संपली असेल तर ताटं वाढायला घ्या हो! अमित आणि अभी यायची वेळ झाली, या तुमच्या “बा”ने सर्वांसाठी पंजाबी खाना कधीच पकवला आहे.”
आजचे राशिभविष्य
आजच्या महाराष्ट्र टाईम्समध्ये हे भविष्य वाचले. हे भविष्य इतके बोगस असते तरीही लोक आवडीने ते वाचतात असा अनुभव आहे. नुसते वाचतच नाहीत तर आपापल्यापरीने त्याचा बादरायण अर्थ, संबंधही जोडून घेतात, हा असा –
मेष : धाडसाने काम
आज बायकोला नक्की सांगणार की तुझ्या स्वयंपाकाला माझ्या आईच्या हातची चव मुळीच नाही.
वृषभ : आथिर्क लाभ
बाबांना पॉकेटमनीसाठी पुन्हा गंडवलं.
मिथुन : नवीन कपडे घ्याल.
नवी जीन्स पाहून ठेवली आहे. कात्रीने ढोपरावर आणि मांड्यांवर कापली तर झ्याक दिसेन मी.
कर्क : खर्च वाढेल.
मी या जीन्स विकत घेणार्या पोरीचा बाबा.
सिंह : मित्र भेटेल
हम्म! कोण येणार आहे आज गळ्यात पडायला? की मलाच कोणाला तरी कापायला हवं?
कन्या : बढतीचा योग
कालच शेजारच्या इमारतीतल्या संजनाचा फोन होता, “मैं तुम्हारे बच्चे की माँ बननेवाली हूँ।”
तूळ : पोटाची काळजी घ्या.
संजनाची रास
वृश्चिक : उगाच चिंता
सांग सांग भोलानाथ, राज-उद्धवाची बनेल काय?
धनु : कौटुंबिक सुख
बायको पोरांना घेऊन माहेरी गेली आहे.
मकर : उत्साहाने काम
बाजूच्या वेंकटच्या इमेलचा पासवर्ड सापडला.
कुंभ : उपासनेत व्यत्यय
आत्ता बाटली ओपन केली आणि कोण उपटलं यावेळी?
मीन : विरोधकांचा त्रास
आमच्या अनुदिनीला प्रतिसाद न येण्याचे मुख्य कारण.
आपला (फलज्योतिषी),
बेधडक.
तिसरे पान
हे तिसरे पान म्हणजे एक अजब प्रकार असतो. यापानावर काय काय वाचायला मिळेल आणि काय काय बघायला मिळेल याची कल्पना साक्षात ब्रह्मदेवालादेखिल करता येणार नाही. या पानावर ज्यांची चित्रे झळकतात, बातम्या झळकतात ते मनुष्यप्राणी आपल्या पोटापाण्यासाठी नक्की काय करतात हे अद्याप आम्हाला समजलेले नाही.
कळले आहे ते इतकेच की सर्व समारंभांना, पार्ट्यांना या मंडळींची वर्णी अत्यावश्यक असते. केसांच्या आणि कपड्यांच्या झिंज्या, एकमेकांशी झोंबाझोंबी करताना काढलेली प्रकाशचित्रे आणि काहीतरी अर्तक्य सनसनाटी बातम्या यांनी हे पान भरलेले असते. गेल्या काही दिवसांतील लक्षात राहिलेल्या बातम्या पुढीलप्रमाणे –
- ब्रिटनी स्पिअर्सचे टक्कल
- संजूची मान्यता
- बिपाशा आणि जॉनचे नवे भांडण
- सलमानची जुनी गर्लफ्रेंड
- ऍना निकोल स्मिथच्या मुलीचा नवा बाप
- अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाचा मुहुर्त
- मॉडेल १ आणि मॉडेल ४ चे मॉडेल २ आणि मॉडेल ८ शी भांडण आणि समझौता.**
- एकता कपूर यांची क च्या बाराखडीतील नवी मालिका
- शाहरूख पुत्र करणला मावशी म्हणतो की रितुपर्णोला?
- शोभा डे मराठीत बोलल्या.
हाय रे आमच्या कर्मा!
** त्या मॉडेल्सची नावे कोणाच्या लक्षात राहत असतील तर कृपया कळवा.
आपला (त्रिदळ),
बेधडक
चोर सोडून…
गर्भात किंवा जन्मत:च मुलींना मारले जाऊ नये म्हणून सरकारने अभूतपूर्व निर्णय घेतला आहे.
म.टा. मध्ये ही बातमी वाचली ती येथे वाचा.
काय पण अफलातून तोडगा शोधून काढलाय आमच्या सरकारने. पोरं जन्माला घालायची कोणी? त्यात पोरी असल्या तर त्यांच्या नरड्याला नखं लावणार हे नराधम आणि त्यांच्यावर दया दाखवल्यागत त्यांच्या मुलींचा सांभाळ आमच्यासारख्या नेभळट करदात्यांच्या पैशांनी करणार आमचे सरकार. वा! वा! शाब्बास!
काही दिवसांनी ज्यांना अपत्य नाही किंवा एकच अपत्य, तेही मुलगा असलेल्या कुटुंबांवर सरकारने जबरदस्ती करून या मुलींना दत्तक घ्या असा फतवा काढला नाही म्हणजे मिळवले.
माहेरची साडी
आज सकाळपासून काय वाचलं? एक चित्रपटाचे टुकार परीक्षण, दोन चार जुन्या-पान्या ओल्याचिंब आठवणी, दोन-चार आईच्या हातच्या पाककृती आणि यासर्वांना लोकांनी डोळे टिपून दिलेली मनापासूनची पावती. जग कोठे चाललंय आणि आम्ही कोठे रमलोय?
शब्द लक्षात घ्या – रमलोय
म्हणजे आम्हीही जगाबरोबर चालतो – बरिस्तामध्ये बसून हातात न परवडणार्या कॉफीचा कप धरून शेजारच्या स्पॅगेटी टॉप घातलेल्या पोरीला वरून खालून न्याहाळतो आणि कागदावर नऊवारी साडी नेसणार्या आपल्या आजीचे वर्णन लिहितो.
मराठी चित्रपटात उमा, आशा काळे, जयश्री गडकर, लीला चिटणीस यांनी प्रेक्षकांना धो धो कसे रडवले आणि अभिनयाची उंची
कशी गाठली ते आताशा आम्हाला समजत आहे.
पुढील काही दिवसांत महाजालावरील मराठी साहित्यात आम्हाला काय वाचायला मिळणार याची एक यादी खाली देत आहोत -
- माझी शाळा
- शाळेतल्या मारकुट्या बाई
- धोंडू शिपाई
- बाहेरची थोडी
(कविता) - आईच्या हातचे धपाटे (पाककृती)
- मी चहा-पोहे खातो
- जिस देस में गंगा बहती है (चित्रपट परीक्षण)
- पु. लं.ची आठवण
- माझी स्मृतीचित्रे
- अभिश्वर्या आणि मी
काही राहिले असेल तर कळावे,
आपला,
(डोके पिकलेला) बेधडक
कॉफी मशिन
आमचे वय काही फार नाही. स्वत:चा आदरार्थी उल्लेख केला की बरेचजण आम्हाला बाबा आदमच्या काळातला एखादा बुवा समजत असावेत. फारसे काही माहित नसताना कल्पनेचे किल्ले लढवायची भारी वाईट खोड असते लोकांना त्याला काय करणार “आम्ही”!!
अभी तो मैं जवाँ हूँ।
दो चार बच्चोंका बाप हूँ।
हम्म! तर सांगणे जैसी बात म्हणजे आमचा मोठमोठी हापिसे आणि इतर धंद्यांच्या ठिकाणी कॉफी यंत्रे बसवण्याचा धंदा आहे आणि आम्ही तो इमानेइतबारे करतो, धंद्यात बरकतही आहे. आता परवा बर्याच वर्षांनी एक मित्र भेटला आणि आम्हाला ‘काय करता आजकाल?’ असा महत्वाचा प्रश्न विचारून गेला. आम्ही त्याला आमच्या नव्या धंद्याबद्दल सांगितले तसा म्हणाला, “लेका! मला अद्याप एकाही पोरीला कॉफी पाजता नाही आली आणि तू आख्ख्या ऑफिसला कॉफी पाजतोस?”
आता हल्लीच्या स्लँगमध्ये ‘कॉफी पाजण्याला’ जर विचित्र अर्थ असेल तर मग आमचा धंदा ….. नको पुढचे वाक्य प्रशस्त नाही.
लोक आपल्याला हवे ते अर्थ काढतात आणि आमच्यासारख्या सज्जन
माणसाची पंचाईत करतात हेच खरे!
पालथ्या घड्यावर पाणी
लोकसत्तेतल्या लोकमुद्रेतील एका लेखाची लिंक देत आहोत. लेखाचे नाव आहे ‘सत्यदर्शनाने डोळे उघडणार की मिटणार?’ ब्राह्मण आणि त्यांना प्रिय असणारा मांसाहार याबाबत सुरेख विवेचन या लेखात आहे.
‘सत्यदर्शनाने डोळे उघडणार की मिटणार?’
लेखक महाशय बहुधा पावर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंगवर मोठा भरवसा ठेवून असावेत. आम्ही आमच्या आयुष्यातील सर्वात सोनेरी दिवसातही इतके ऑप्टिमिस्टिक होऊ शकत नाही. ही लिंक येथे दिल्यावर आमचे कुमार केतकर नाही झाले म्हणजे मिळवले.
आता सांगा, सत्यदर्शनाने डोळे कसे काय उघडणार कारण ज्यांनी डोळ्यांवर झापडे ओढून घेतली आहेत त्यांना डोळे उघडून तरी समोर काय दिसणार? अंधारच ना!!!!
सूनबाई
सूनबाई मोठी गुणाची हो!
तिला स्वयंपाक येतो का? तिला सासरची माणसे आवडतील का? तिला लग्नानंतर मुलंबाळं हवी का? तिला एकत्र कुटुंबात राहायला आवडेल का? या सर्व प्रश्नांचे उत्तर ‘नाही माहित’ आम्हाला! तरीही सूनबाई गुणाची कारण ती आमची सून नाही हो, ही सूनबाई आहे बच्चन साहेबांची.
आयुष्याच्या माध्यान्हीला आलेली, आपल्या पोरापेक्षा मोठ्या वयाची, दोन चार पूर्वीची प्रेमप्रकरणे करून पार झालेली, विश्वसुंदरी, जिच्याकडे आपल्या पोरापेक्षा दोन-चार चित्रपट अधिक असतील – हॉलिवूडचे हो! अशी सून बच्चनसाहेबांना चालणार आहे ना, मग आपण कोण तोंडं वेंगाडणारे?
आता बच्चनसाहेब सूनबाईने लग्नानंतरही चित्रपटांत काम करावे असे म्हणताहेत आणि नातवाचे तोंड पाहायलाही उत्सुक आहेत म्हणे.
पण सूनबाई काय म्हणते? ती काय म्हणणार? गुणाची ना ती! सूनबाई हल्ली लाजून हळूच खाली बघते ही अशी.

पिंगट केसांची बया
ऍना निकोल स्मिथच्या अकस्मिक मृत्यूमुळे कित्येक जीव हळहळले असतील. तिच्यातील आणि मेरलिनमधील साम्य, प्लेबॉयच्या मध्यपानावरील तिच्या मादक अदा, तिचे ते बालीश लडिवाळ बोलणे आणि इतरांची नजर आपल्या कोणत्या शरीरसौष्ठवावर खिळून राहिल याची घेतलेली पुरेपुर काळजी यासर्वांना अनेक रसिकांना मुकावे लागणार आहे.
आमच्या देशात कोणाचा मृत्यू झाला तर त्याबद्दल खोट्टे खोट्टे का होईना पण बरे बोलण्याची प्रथा आहे. अमेरिकेत ती तशी नाही असं म्हणता येणार नाही पण फारशी नाहीच. तेव्हा काल ऍनाच्या लहान पोरीचे काय होणार, तिचा बाप कोण, पहिल्या नवर्याच्या इस्टेटीतील हिस्सा तिला मिळणार का? ते तिचा वकिल आणि तथाकथित नवरा तिला इतरांना कसा पुरवत होता या चर्चांना भारीच उधाण आलेले आहे.
आमची प्रतिक्रिया: पुरुषांच्या जीवनातून डोळे खिळून राहतील असे काहीतरी मोठ्ठे पाहण्याची एक संधी गेली.

पंचाईत
आताशा म्हणे बर्याच मनोगतींची पंचाईत झाली आहे. त्यांना कोणी वालीच उरलेला नाही. त्यांची प्रतिभा गायब होण्याच्या मार्गावर आहे म्हणून प्रत्येकाने आपापला ब्लॉग टाकला आहे.
आम्हाला एक कळत नाही. “वाहवा! भले शाब्बास!” अश्या प्रतिसादांसाठी लेखन करण्याची सवय झालेल्या निदान काहीजणांनातरी (कृपया, या काहीजणांची संख्या विचारू नये.
) हे ब्लॉगविश्व कसे बरे रुचणार?
असो. आम्हाला कशाला नसती पंचाईत?